Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीचे ‘जलयुक्त शिवार’ शामरावनगरमध्ये घरात शिरले पाणी

30-Jul-2019 : सांगली / प्रतिनिधी

गेले दोन दिवस पडलेल्या पावसामुळे सांगली शहराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शामरावनगरमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचे सुमारे वीस घरात पाणी शिरले आहे , तर अनेक घरांना पावसाच्या पाण्याने वेढा दिला आहे. दुसरीकडे शहरातील स्टेशन चौक, सिव्हिल चौक, जुना बुधगाव रोड, मारूती चौक, राजवाडा चौक, झुलेलाल चौक आदी परिसरात पाण्याची तळी साचली आहेत.

गेल्या दोन दिवसांत शहर व परिसरात संततधार सुरू आहे. शामरावनगरमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रशासनाने चरी खोदल्या नाहीत. त्यामुळे या भागातील पन्नास घरांना पावसाच्या पाण्याने वेढा दिला आहे. आदित्य कॉलनी व सद्गुरू कॉलनी येथील सहा घरात पावसाचे पाणी शिरले होते, तर या परिसरातील वीस ते पंचवीस घरांच्या उंबर्‍यापर्यंत पावसाचे पाणी पोहोचले आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या भागातील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत.

तर दुसरीकडे शहरातील प्रमुख चौक जलमय झाले आहेत. शहरातील मुख्य मारुती चौक, दत्त-मारुती रस्ता, भाजी मंडई परिसरात नेहमीप्रमाणे गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे भाजी बाजार पाण्यात गेला असून, नागरिक व विक्रेत्यांची तारांबळ उडाली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter