30-Jul-2019 : सांगली प प्रतिनिधी
चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा अतिवृष्टी झाली. शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यात मंगळवारी पावसाची संततधार सुरुच राहिली. धरण क्षेत्रातील पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढत नदीकाठी प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. वाळवा तालुक्यातील कापूसखेड येथे भिंत कोसळून एक महिला ठार झाल्याची घटना घडली. औदुंबरच्या दत्त मंदिरात पाणी शिरले असून सभामंडपापर्यंत आले आहे. शिराळा आणि वाळवा तालुक्याला पावसाने दिवसभर झोडपून काढले. आयर्विन पुलाची कृष्णा नदीची पाणीपातळी २४ तासात तेरा फुटांनी वाढून सायंकाळी सात वाजता पाणीपातळी ३० फुट झाली होती.
चांदोली, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. येथे दिवसभरातही ३५ मिलीमीटर पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजता चांदोली धरणात २८.९० टीएमसी पाणीसाठा असून धरण ८२ टक्के भरले आहे. कोयना धरण परिसरात चोवीस तासात १५० मिलीमीटर पाऊस झाला. सकाळपासून पाचपर्यंत १०५ मिलीमिटर पाऊस पडला. सध्या धरणात ७२.९५ टीएमसी पाणी साठा झाला आहे. महाबळेश्वरला गेल्या ३६ तासांत १९३, नवजाला ४२६ मिलिमिटर पाऊस पडला, रात्री उशिराही धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरुच होता.
पश्चिम भागातील पलूस, कडेगाव, मिरज पश्चिम भागात पावसाची संततधार सुरु राहिली. पूर्व भागातील अनेक गावांत पावसाच्या सरी बरसल्या. सांगली, मिरज शहरांतही दिवसभर पावसाची रिपरिप असल्याने जनजीवन विस्कळित झाले.
|