30-Jul-2019 : इस्लामपूर / प्रतिनिधी
इस्लामपूरहून तासगावकडे जाणारी एस.टी.बस वाळवा फाट्यानजीक समोरुन येणार्या मिनीबसला वाट देण्याच्या प्रयत्नात रस्त्यावरून घसरत रस्त्याकडील खड्ड्यात जावून पलटी झाली. या अपघातात तिघेजण किरकोळ जखमी झाले . सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
याबाबत माहिती अशी की , मंगळवार दि. ३० जुलै रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास इस्लामपूर आगारातून वाळवा मार्गे तासगावला जाणारी एस.टी.बस (क्र. एम.एच.१२ सी.एच.७७५९) घेवून चालक विजय माने व वाहक सुधाकर कोळी प्रवाशांसह निघाले. इस्लामपूर जवळील वाळवा फाट्यापासून ५०० मीटर अंतरावर एस.टी.आली असता समोरुन मिनीबस येत होती. त्या बसला वाट देण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या एका बाजूला घसरत आली. चालकाने बस रस्त्यावर घेण्याचा प्रयत्न केला, परंतू बस रस्त्याकडेच्या खड्ड्यात जावून पलटी झाली. अचानक झालेल्या अपघातामुळे बसमधील प्रवाशी भयभीत झाले. बसमधून २० प्रवाशी प्रवास करत होते. बसमधील भागिरथी गणपत माळी या महिलेसह दोन महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. बस खड्ड्यामध्ये डाव्या बाजूला पलटी झाली होती. विद्यार्थी व नागरिकांनी बसच्या उजव्या बाजूच्या खिडकीच्या काचा फोडून सुटका करुन घेतली. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत र् केली. बसमधील सर्व प्रवाशी बसमधून सुखरुप बाहेर पडले. दुपारी १२.३० च्या सुमारास क्रेनद्वारे बसला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. इस्लामपूर आगारातील दुसर्या एस.टी.बस ची व्यवस्था करुन प्रवाशांना मार्गस्थ करण्यात आले.
|