Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विधानसभा इच्छुकांच्या मुलाखती शुक्रवारी

30-Jul-2019 : सांगली / प्रतिनिधी

प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पलूस-कडेगावचे आमदार विश्‍वजीत कदम यांचा जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता भावे नाट्यमंदिरात पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार होणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली, तसेच विधानसभेच्या इच्छुकांनी दाखल केलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीदेखील शुक्रवारी सकाळी दहा वाजता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, आ.विश्‍वजीत कदम यांना दोनवेळा युवकचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले होते. आता त्यांच्याकडे प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. ते सर्वांना एकत्र करून पक्ष मजबूत करतील. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा कॉंग्रेस पक्ष व सर्व आघाड्यांच्यावतीने शुक्रवारी सत्कार करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार होणार असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना निमंत्रित केले आहे. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नाट्यगृहात होईल. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला उभारी मिळावी तसेच विधानसभा निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे. मेळाव्यातून जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ताकद दिली जाईल.

तर विधानसभेसाठी कॉंग्रेस पक्षाकडून इच्छुक असणार्‍यांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्या इच्छुकांच्या मुलाखती शुक्रवारी सकाळी दहा वाजता होणार आहेत. त्यासाठी निरीक्षक म्हणून प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पी.एन. पाटील आणि चिटणीस अलका राठोड तसेच जिल्हाध्यक्ष, प्रभारी उपस्थित राहतील.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter