Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
पावसाचा जोर, कृष्णेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

02-Aug-2019 : सांगली / प्रतिनिधी

जिल्ह्यात दोन दिवस कमी झालेल्या पावसाचा जोर शुक्रवारी पुन्हा वाढला. चांदोली आणि कोयना धरण परिसरात पुन्हा अतिवृष्टी झाली असून दोन्ही धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. चांदोलीतून विसर्ग वाढविण्यात आला असून सायंकाळी ९ हजार ६०८ क्युसेकने तर कोयनेतून २१०० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. वारणाकाठावरील पूरस्थिती कायम असून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली. सांगलीच्या आयर्विनची पातळी संध्याकाळी ३७ फुटांवर पोहोचली. तीन पूल, अकरा रस्त्यांसह दहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे आठ ठिकाणचे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

चांदोलीसह शिराळा तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी झाली. चोवीस तासात १४९ तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात १६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सायंकाळी पाच वाजता चांदोली धरणात ३१.२१ टीएमसी पाणीसाठा असून ८८.४२ टक्के भरले आहे. कोयना धरणात ८४.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने चांदोली आणि कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. शुक्रवारी दिवसभरात कृष्णेची पातळी सरासरी चार फुटांनी वाढली. सांगलीच्या आयर्विन पुलाची पातळी संध्याकाळी ३७ फुटांवर पोहोचली. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.

वारणा काठावरील पूरस्थिती सलग पाचव्या दिवशी कायम राहिली. तीन पुलांसह नऊ बंधारे पाण्याखाली गेले. वारणा नदीवरील अनेक पुलांवर पाणी असल्याने आठ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्या ऐवजी अन्य मार्गावरुन वाहतूक सुरु करण्यात आली आहे. दरम्यान कोयना आणि चांदोलीतून पाणी सोडण्यात येत असल्याने अलमट्ठी धरणातील पाण्याचा विसर्ग शुक्रवारी वाढविण्यात आला. अलमट्टीत १०३ टीएमसी पाणी साठा झाला असून २ लाख ३८ हजार २६६ क्युसेक तर राजापूर बंधार्‍यांतून १ लाख ६७ हजार ९७२ क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीची पाणी पातळी स्थिर राहण्यास मदत होईल.

जिल्ह्यात दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. शिराळा, वाळवा, पलूस आणि कडेगाव तालुक्यातील अनेक गावांना जोरदार पाऊस झाला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter