02-Aug-2019 : सांगली / प्रतिनिधी
जिल्ह्यात कॉंग्रेसला १९९९ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी स्व.शिवाजीराव देशमुख, स्व.प्रकाशबापू पाटील व स्व.पतंगराव कदम यांनी कॉंग्रेसची कमान सांभाळली होती. तीच परिस्थिती आता आहे. त्यामुळे विश्वजीत कदम, विशाल पाटील व सत्यजीत देशमुख आम्ही एकदिलाने पक्षाची कमान स्विकारणार असून पक्ष ताकदीने उभा करू, असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ.विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.
प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आ.विश्वजीत कदम यांचा जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आ.विश्वजीत कदम बोलत होते. ते म्हणाले, १९९९ मध्ये कॉंग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादीची निर्मिती झाली. या काळात जिल्हा कॉंग्रेसची मोठी पडझड झाली होती. त्यावेळी स्व.शिवाजीराव देशमुख, स्व.प्रकाशबापू पाटील व स्व.पतंगराव कदम यांनी कॉंग्रेसची कमान सांभाळली होती. त्यानंतर कॉंग्रेसला चांगले दिवस आहे. १९९९ ची परिस्थिती २०१९ मध्ये आली आहे. या काळात विशाल पाटील , सत्यजीत देशमुख व सर्वजण एकदिलाने काम करू व त्यावेळची पुनरावृत्ती घडवू, यामध्ये जेष्ठांची देखील मदत घेऊ, असे प्रतिपादन आ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, भाजपने पाच वर्षात जनतेची फसवणूक केली आहे. शेतकरी, व्यापारी, तरूण व सर्वसामान्य नागरिक भाजपच्या कारभारावर नाराज आहेत. अर्थव्यवस्था ढासळली आहे, उद्योगधंदे वाढलेले नाहीत. देशात जातीय तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे जनता सुखी नाही.
|