Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
प्रसुती दरम्यान डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू

03-Aug-2019 : इस्लामपूर/ प्रतिनिधी

बाळंतपणात हलगर्जीपणा करून विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. सीमा पोरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विवाहितेच्या पतीने इस्लामपूर पोलिसात निवेदनाद्वारे केली आहे. सारिका वैभव कोळेकर (वय २२, रा.उरण इस्लामपूर) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबतचे निवेदन पो.नि.नारायण देशमुख यांना देण्यात आले आहेे.

शहरातील स्त्री रोग तज्ञ डॉ. सीमा पोरवाल यांच्याकडे सारिका हिचे गरोदरपणातील सर्व उपचार सुरू होते. त्यांना ३१ जुलैला प्रसूतीसाठी डॉ. पोरवाल यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. १ ऑगस्टला दुपारी १२ च्या दरम्यान प्रसूती साठी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले होते. दुपारी पावणे एकच्या दरम्यान सारिका यांनी मुलीला जन्म दिला. दरम्यान लहान बाळ रडत नाही, त्याचे ठोके कमी पडत आहेत. श्‍वसनाचा त्रास होतो असे सांगून नवजात बाळाला उपचारार्थ दाखल करण्यास सांगितले. घाई गडबडीत वैभव कोळेकर व त्यांच्या आईने बाळाला नेत उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. पुन्हा परत पोरवाल हॉस्पिटलमध्ये आल्या वर प्रसूतीनंतर सारिका हिला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणले नव्हते. स्वतः डॉक्टर पोरवाल या प्रसूतीवेळी अनुपस्थित होत्या. तेथील हसीना नर्स, कृष्णाई हॉस्पिटलच्या डॉ.पाटील हजर होत्या. पावणे तीनच्या दरम्यान डॉ.सीमा पोरवाल यांनी सारिका यांच्या नातेवाईकांना बोलावून प्रसूती दरम्यान सारिकाला रक्तस्त्राव झाला आहे. प्रकृती गंभीर आहे. तिला कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे हलविण्यास सांगितले. त्यांनीच रुग्णवाहिका बोलावून रुग्णाला आणि नातेवाईकांना उपचारासाठी कराडला पाठविले. तेथील डॉक्टरांनी सारिका हिला तपासून प्रसूतीवेळी निष्काळजीपणा केल्यामुळे नस तुटली असल्याचे सांगितले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter