03-Aug-2019 : कडेगाव / प्रतिनिधी
कडेगाव तालुक्यात सुरू असलेल्या धुवॉंधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी व ओढ्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील येरळा व नांदणी नदीला पूर आला आहे. दोन्ही नद्या पात्राबाहेर पडल्या असून वांगी व शिवणी येथील पूल पाण्याखाली गेले आहेत.
जोरदार पावसामुळे चिंचणी येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून त्याचे ३१ पैकी सहा स्वयंचलित दरवाजे उघडले गेल्याने २ हजार ६०० क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील सोनहीरा, कोतमाई, महादेव या प्रमुख ओढ्यांसह अन्य छोट्या ओढ्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कडेगाव-रायगाव, कडेगाव-अपशिंगे, कडेगाव-तडसर, विहापूर-शाळगाव, कडेगाव-सोहोली, कडेगाव-निमसोड, चिंचणी-सोनकीरे, सोनसळ-शिरसगाव, शिरगाव-भाळवणी, चिंचणी-वाजेगाव, अंबक-देवराष्ट्रे, चिंचणी-मोहिते वडगाव, कमळापूर-रामपूर, कडेगाव-शिवाजीनगर यांसह वांगी-शेळकबाव व वांगी-शिवणी हे पूल पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने या ठिकाणची वाहतूक बंद केली आहे. नेर्ली येथे क्षीरसागर वस्ती या ठिकाणी टेंभू योजनेचा मुख्य कालवा फुटल्याने परिसरातील शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
|