03-Aug-2019 : सांगली / प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा २९ ऑगस्टला सांगली जिल्ह्यात दाखल होत असून त्या दिवशी सांगलीत चार ते पाच महत्वाच्या नेत्यांचे प्रवेश होणार असून त्यांचे प्रवेश हे राजकीय भूकंप घडविणारे असतील असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.पृथ्वीराज देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
२९ ऑगस्ट रोजी महाजनादेश यात्रा सांगली जिल्ह्यात दाखल होत असून त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.आता भाजप प्रवेश बंद या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आ. देशमुख म्हणाले, ‘सध्या भाजपात इनकमिंगचे प्रमाण वाढले आहे. प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याबाबतचे अधिकार जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. चांगली भरती करण्यात येत आहे. सध्या भाजपला चांगले दिवस आले आहेत. अनेक चांगल्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ज्याप्रमाणे महापालिका, लोकसभा आम्ही जिंकली त्याचप्रमाणे येणारी विधानसभाही जिंकू असेही आ.देशमुख म्हणाले. महाजनादेश यात्रेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा राज्याचे कामगार व पर्यावरण राज्यमंत्री संजय भेगडे म्हणाले, ‘ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून दि. १ ऑगस्ट ते १ सप्टेंबर अखेर महाजनादेश यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेला १ ऑगस्टला मोझरीतून प्रारंभ झाला.
दि.१ ते ९ ऑगस्ट अखेर महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा आहे. १७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या दुसर्या टप्प्यात कोकण, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी यात्रा जाणार आहे.सांगली जिल्ह्यात २९ ऑगस्ट रोजी महाजनादेश यात्रेचे सकाळी १० वा.कासेगाव येथे आगमन होणार असून त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्यावतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर पेठ, इस्लामपूर, ताकारी, पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ, मणेराजुरी, कळंबी, भोसे, मिरज, सांगली आणि इनामधामणी येथे महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. १०० कि.मी.चा प्रवास आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो होणार आहे. जिल्ह्यात सर्वप्रथम पलूस येथे मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर तासगाव येथील सभा झाल्यानंतर सांगलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. ३२ जिल्ह्यांतून ४ हजार ३८४ कि.मी. आणि १७५ पेक्षा अधीक विधानसभा क्षेत्रातून ही महाजनादेश यात्रा जाणार आहे. ही महाजनादेश यात्रा राजकीय मार्गाला नवी दिशा देणारी असेल असेही ते म्हणाले.यावेळी सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे,कृषी राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत, आ.सुधीरदादा गाडगीळ, आ.विलासराव जगताप, मकरंद देशपांडे, नितीन शिंदे, राजेंद्र देशमुख, रवी अनासपुरे,महापौर संगीता खोत यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
|