Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जिल्ह्यातील २० रस्ते पाण्याखाली, अनेक गावांच्या संपर्कात अडचणी : कृष्णा, वारणेची इशारा पातळीकडे वाटचाल

03-Aug-2019 : सांगली / प्रतिनिधी

धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कृष्णा आणि वारणा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरु आहे. कोयनेतून १९ हजार २२६ क्युसेकने तर चांदोलीतून १६ हजार ३५४ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख चार पुलांसह दहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाणी पातळीत वाढ होत असल्याने वीस रस्ते पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे आठ ठिकाणचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. सांगलीच्या आयर्विन पुलाची पातळी शनिवारी संध्याकाळी ३७ फुटांवर पोहोचली.

चांदोली आणि कोयना धरण परिसरात अतिवृष्टी सुरुच आहे. चांदोलीत चोवीस तासात १४४ तर कोयना धरण पाणालोट क्षेत्रात १२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सायंकाळी पाच वाजता चांदोली धरणात ३२.३३ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ९४ टक्के भरले आहे. त्यामुळे विसर्ग वाढविण्यात येणार आहे. कोयना धरणात ८९.९० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात पाऊस कायम असल्याने दोन्ही धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. शनिवारी दिवसभरात कृष्णेची पातळी स्थिर होती. सांगलीच्या आयर्विन पुलाची पातळी संध्याकाळी ३७ फुटांवर पोहोचली. आमणापूर-भिलवडी पूल पुन्हा शनिवारी सकाळी पाण्याखाली गेला. सकाळपर्यंत दोन फुटाने पाणी वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्यावतीने व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यात पूरपरिस्थिती वाढणार नसल्याची दक्षता घेवून कर्नाटकातील अलमट्टी धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी अलमट्टी धरणातील अधिकार्‍यांशी समन्वय साधून आहेत. अलमट्टी धरणात १०२ टीएमसी पाणी साठा झाला असून २ लाख ३९ हजार ५६१ क्युसेक तर राजापूर बंधार्‍यातून १ लाख ७७ हजार ८५६ क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

वारणा काठावरील पूरस्थिती गंभीर बनू लागली आहे. तीन पुुलांसह नऊ बंधारे पाण्याखाली कायम आहेत. आठ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्याऐवजी अन्य मार्गांवरुन वाहतूक सुरु करण्यात आली आहे. कांदे-मांगले या पूलावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक भाट शिरगाव, इंग्रूळ या मार्गाने सुरू करण्यात आली आहे. काखे-मांगले पुलावरील वाहतूक सागाव व चिकुर्डे या पर्यायी मार्गाने सुरू आहे. मांगले-शिंगटेवाडी मोरणा नदीवरील मांगले-शिराळा या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. मांगले-सावर्डे हा रस्ता पाण्याखाली गेला आहे . ऐतवडे खुर्द, कुंडलवाडी, तांदूळवाडी आणि निलेवाडी गावाजवळ पूल पाण्याखाली गेले असून पर्यायी मार्ग असलेल्या चिकुर्डे पुलावरून वाहतूक सुरू आहे. मिरज तालुक्यातील दुधगाव बंधारा पाण्याखाली गेला असून बागणी मार्गे वाहतूक सुरु आहे. मौजे डिग्रज-कसबे डिग्रज बंधारा पाण्याखाली गेला असून सांगली, कर्नाळ रोड मार्गे नावरसवाडी मार्गे वाहतूक सुरू आहे.

जिल्ह्यात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरु होता. शिराळा, वाळवा, खानापूर, पलूस, तासगाव, कडेगाव तालुक्यातील अनेक गावांत चांगला पाऊस झाला. सांगली शहरातही दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. येथील दत्तनगर, काकानगर परिसरातील कुटुंबे अद्यापही स्थलांतरित आहेत.

जिल्ह्यातील पाऊस

जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात सरासरी १४.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक ४३.७ मिलीमीटर पाऊस झाला. मिरज ११.३, वाळवा १६.८, खानापूर १४.३, तासगाव १२.२, कवठेमहांकाळ ४.३, पलूस ९.५ आणि कडेगाव २३.६ मिलिमीटर पाऊस झाला.

कृष्णा नदीवरील पुलांची पातळी

कृष्णा नदीवरील विविध पुलांच्या ठिकाणची सायंकाळी पाच वाजताची पाणी पातळी फूटात अशी - कृष्णा पूल, कराड २६.६, बहे १२, ताकारी ४०.६, भिलवडी- ४०, आयर्विन पूल सांगली ३७ व अंकली पूल ४१.८ व म्हैसाळ ४९ फूट.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter