Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगली कारागृहातील १७ कैद्यांना कळंबा जेलमध्ये पाठविले

16-Aug-2019 : सांगली / अमित दामले

तब्बल ३४० कैद्यांना आपल्या विळख्यात पकडून ठेवणारे सांगली कारागृह नुकत्याच आलेल्या महापुराच्या धक्क्यातून अद्यापही सावरलेले नाही. महापूर येऊन आठ दिवस उलटून गेले तरी कारागृहाच्या आतील काही भागातील पाणी काढण्याचे काम सुरुच आहे. कारागृहातील कैद्यांना ठेवण्याची अडचण लक्षात घेता महापुराचा फायदा घेत पळून जाण्याच्या तयारीत असणार्‍या १७ कैद्यांना प्रधान जिल्हा न्यायाधिशांच्या परवानगीने कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात पाठविण्यात आले आहे.

आठ दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात महापुराने थैमान घातले होते. २००५ साली आलेल्या पुराचे रेकॉर्ड मोडत (२०१९) पाण्याच्या पातळीने ५७.५ फुटांची उंची गाठली होती. या महापुराने अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पुरात सांगली कारागृहाच्या दरवाजात १२ फूट पाणी होते. कारागृहात २०५ पुरुष आणि ३० महिला कैद्यांची अशी २३५ ची क्षमता असताना येथे ३२० पुरुष आणि २० महिला अशा एकूण ३४० कैद्यांना ठेवण्यात आले होते. त्यातील १७ जणांना कळंबा कारागृहात पाठविण्यात आले आहे. या ठिकाणी असणारी अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली असून ४२ कॅमेर्‍यांचे कामकाज ठप्प झाले आहे. अधीक्षक कार्यालय, न्याय विभाग, आस्थापना कार्यालय पाण्याखाली होते. त्यामुळे तेथील रेकॉर्डचा लगदा झाला असून तो लगदा वाळविण्याचे काम सुरु आहे. तसेच कारागृहातील अन्य, धान्य, भाजीपाला कुजला आहे. त्यामुळे कैद्यांसाठी सामाजिक संस्था आणि व्यक्तींकडून भोजन देण्यात येत आहे. अत्यल्प रेकॉर्डच सुरक्षित राहिले आहे. कपडा गोडावूनमध्येही पाण्याचा शिरकाव झाला होता. ग्रंथालयातही पाणी शिरल्याने त्या ठिकाणच्या १४०० पुस्तकांना हानी पोहोचली आहे. संगणकही पुराच्या विळख्यात सापडले होते.

सांगलीत नवे कैदी ठेवण्यात अडचण असल्याने त्यांना न्यायालयाच्या परवानगीने कळंब्याला पाठविण्यात येत आहे. कारागृहात पाणी शिरल्याने खालच्या मजल्यावरील कैद्यांना वरच्या मजल्यावर ठेवण्यात येत असताना दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. कारागृह अधीक्षक सुशील कुंभार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पाण्यात उड्या घेत दोघांना शिताफीने पकडले होते. कारागृहातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे. सांगली कारागृहात दोन अधिकारी आणि १५ कर्मचारी व एक लिपिक असे १८ जण मदतीसाठी पाठविण्यात आले आहेत. कारागृह विभागाच्या वरिष्ठांकडून सांगलीतील परिस्थितीचा दररोज आढावा घेण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून कारागृहातील वीजपुरवठा खंडित होता.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter