16-Aug-2019 : सांगली / प्रतिनिधी
जिल्ह्यात मागील दहा दिवसांत पावसाने हाहाकार माजवल्याने महापुराचा सामना करावा लागला. कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील शेती पुराच्या पाण्याखाली गेली. जिल्ह्यात नजर अंदाजे १ लाख ३९ हजार ७२४ शेतकर्यांचे ६६ हजार ९८.०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ऊसाचे सर्वाधिक ३५ हजार हेक्टरचा समावेश आहे. याशिवाय सोयाबीन, मका, भात, केळी आणि द्राक्षांचाही समावेश असून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे गतीने करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील अतिवृष्टीनंतर सर्वच नद्या पात्र सोडून वाहू लागल्या आहेत. कोयना आणि वारणा धरणांच्या क्षेत्रात मोठा पाऊस झाला आहे. परिणामी धरणांमधून मोठा विसर्ग सुरू करण्यात आला होता. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरु राहिली. गेल्या चार दिवसांत पावसाने विश्रांती घेतली असल्याने पूर ओसरु लागला आहे. धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि अतिवृष्टीमुळे कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला होता. गेल्या काही दिवसांपासून असलेली पूरस्थिती आता ओसरु लागली आहे. पाणी नदीपात्रात गेल्याने जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. महापुरामुळे घरांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील नजर अंदाजाने १ लाख ३९ हजार ७२४ शेतकर्यांचे ६६ हजार ९८.०५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले.
वाळवा, पलूस, शिराळा आणि मिरज तालुक्यातील शेतकर्यांच्या पिकांना फटका बसला. जिल्ह्यात साधारणपणे ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस शेती होते. कृष्णा आणि वारणा काठावर ऊसाचे आगार असून तेथील सर्वाधिक ३५ हजार हेक्टरवरील नुकसान झाले. सध्या काही ठिकाणी अद्यापही ऊसामध्ये पाणी साचून राहिले आहे. दोन्ही नद्यांच्या काठचा ऊस पाण्याखाली गेल्याने तो वाया गेला आहे. चारही तालुक्यातील नदीकाठच्या ऊसाचे मोठे नुकसान झाले. ऊस पिकाची वाढ थांबण्याचा धोका आहे. या सगळ्याचा फटका ऊस उत्पादक शेतकर्यांना बसला. सोयाबीन सुमारे ९ हजार हेक्टरवरील वाया गेला. मका आणि भुईमुगाची पिके हातची गेली आहेत. याशिवाय केळी आणि द्राक्षबागांचेही नुकसान झाले. घरे आणि शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम गतीने हाती घेण्यात आले आहे. तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणताही शेतकरी नुकसानीपासून वंचित राहणार नाहीत, याबाबतची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
महापुरामुळे ग्रामीण भागातील ४१ हजार ७२९ ग्राहकांची वीज बंद करण्यात आली होती. त्यापैकी ३१ हजार १० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
|