Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
स्वच्छता व पाण्यासाठी पूरग्रस्तांचा रास्ता रोको

16-Aug-2019 : सांगली / प्रतिनिधी

वाल्मिकी आवास योजना, दत्तनगर, काकानगर आदी परिसरातील महापालिकेने पिण्याच्या पाण्याचे टँकर व स्वच्छता करून न दिल्याने या भागातील संतप्त पूरग्रस्तांनी बायपास रोडवर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. तर महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सुर्यवंशी व आयुक्त नितीन कापडणीस यांना देखील पूरग्रस्तांना चांगलेच सुनावत घेरावो घातला. आयुक्तांनी तातडीने सुविधा देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे वाल्मिकी आवास योजना, काकानगर, सुर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, राजीव गांधी झोपडपट्टी आदी या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. महापूर ओसरल्यानंतर मनपाने संबंधित नागरिकांचे पुनर्वसन केंद्र बंद केलेे. परंतु त्या नागरिकांच्या भागात लाईट, पाण्यासह सर्व सुविधा नसल्याने त्या लोकांनी मदत केंद्रातून घरी जाण्यास नकार दिला होता. त्या नागरिकांना शेखर माने यांनी मध्यस्थी करीत घरी पाठवून भोजन व सोयी-सुविधा पुरविल्या. त्यानंतर लोक घरी परतले. परंतु त्यांच्या भागात, घरासमोर, रस्त्यांवर दलदल कायम असून, त्यांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. कचरा उठाव, सफाई होत नाही. पाणीपुरवठ्याचाही ठणठणाट आहे. टँकरनेही पुरवठा होत नाही. यामुळे आज नागरिक संतप्त झाले. त्यांनी थेट बायपास रोडवर रस्तारोको केला.

महापौर खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, शेखर माने यांंनी तेथे धाव घेतली. परंतु महिलांनी महापौर खोत, सूर्यवंशी यांच्याशी वाद घातला. पूरग्रस्तांनी महापौर व आयुक्तांना घेरावो घातला. घरामध्ये राहण्याची सोय नसताना आम्हाला पूरगस्त स्थलांतर केंद्रातून बाहेर काढण्यात आले. महापालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर दिला नाही. स्वच्छतेची कोणतेही व्यवस्था केली नाही, अशा परिस्थितीमध्ये रहायचे कसे? असा संतप्त सवाल महापौरांना केला. तर शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक शेखर माने हे देखील आंदोलनस्थळी उपस्थित झाले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter