Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जावेद गवंडी टोळीवर मोक्का

03-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार जावेद गवंडी व त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जावेद गवंडी याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी टोळी निर्माण केली आहे. दरोडा टाकणे, जबरी चोरी, दरोड्याची तयारी करणे, जीवे मारणे तसेच टोळीची दहशत राहावी म्हणून हत्यार जवळ बाळगणे अशी कृत्ये करुन त्यावर मिळणार्‍या पैशावर चैनीचे जीवन जगत आहे. २०१७ पासून टोळीच्या गुन्ह्यांची मालीकाच आहे. त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे १५ गुन्हे सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात दाखल आहेत. सांगली ग्रामीणचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत बेदरे यांनी या टोळीवरील मोक्काचा प्रस्ताव अवलोकनासाठी पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे पाठविला होता. शर्मा यांनी याचे अवलोकन करुन मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.सुहास वारके यांच्याकडे पाठविला होता. त्याला डॉ.वारके यांनी मंजुरी दिली आहे. दि.१३ मे रोजी जमादार शरीफ पठाण यांनी फिर्याद दिली होती की, जावेद नूरमहंमद गवंडी (वय ३६, रा.राजीव गांधीनगर, सांगली), नितीन सुनील आणेराव (वय ३०, रा.विघ्नहर्ता कॉलनी, सांगली), आकाश प्रकाश चव्हाण (रा.राजीव गांधीनगर, सांगली) यांनी संगनमताने माझी म्हैसाळ रोडवर केजीएन नावाची लाकूड वखार आहे. तिघांनी मोबाईलवर फोन करुन जुन्या इमारतीच्या तीन टन लाकडाची विक्री करायची आहे, असे सांगून कर्नाळ येथे बोलावून नांद्रे रस्त्याने नेत पडीक जमिनीच्या झुडूपात नेऊन खिशातील लाकूड खरेदीसाठी आणलेले १५ हजार रुपये आणि शर्टाच्या खिशातील २०० रु. तसेच चाकूचा धाक दाखवून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन मोटारसायकल काढून नेली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter