03-Sep-2019 : तासगाव / प्रतिनिधी
गुलाल, पेढ्यांची उधळण ‘मोरया मोरया’ असा तरुणाईचा जयघोष व हजारो गणेशभक्तांच्या साक्षीने तासगावचा २४० वा ऐतिहासिक रथोत्सव मंगळवारी उत्साहात संपन्न झाला. गणेशभक्तांच्या उपस्थितीने तासगाव शहर फूलून गेले होते. सकाळी सहा वाजल्यापासूनच गणपती मंदिरात दर्शनासाठी भक्तांची झुंबड़ उडाली होती. पटवर्धन संस्थानच्या दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन पावणे चार वाजता झाले. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचीत प्रकार न होता रथोत्सव सुरळीत पार पडला. तासगावच्या वाहतूक विभागाने वाहतुकीची उत्तम व्यवस्था ठेवली होती.
तासगावचा गणपती उजव्या सोंडेचा असून तो नवसाला पावतो. अशी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातही ख्याती आहे. गणपती पंचायतन व पटवर्धन संस्थानच्या या रथोत्सवास २४० वर्षांची परंपरा आहे. ९६ फूटी गोपुर , तीन मजली ,तीस फुट उंचीचा व चार चाकी रथ गणेशभक्तांनी दोरखंडाच्या सहाय्याने ओढण्याची महाराष्ट्रातील एकमेव परंपरा आहे.
सार्वजनिक रथोत्सवाची सुरवात परशुराम भाऊ पटवर्धन यांनी लोकमान्य टिळक यांच्या अगोदरच तासगाव येथून केली होती. सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन हा रथ ओढण्याची परंपरा आहे . कोणताही भेदभाव न होता हा रथोत्सव सामाजिक ऐक्याची प्रेरणा देतो. सोमवारी वाजत गाजत तासगाव संस्थानच्या दीड दिवसाच्या शाडूच्या मातीच्या मुर्तीची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना झाली , तर मंगळवारी सकाळी राजवाड्यात श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्या हस्ते आरती झाली. दुपारी १ वाजता वाद्याच्या गजरात पालखीमधून मातीच्या मुर्तीचे व ऐतिहासिक १२५ किलोंच्या पंचधातुच्या मुर्तीचे राजवाड्यात आगमन झाले.
पालखीसमोर पारंपरिक गोंधळी, होलार व कैकाडी समाज मानाने वादन करीत होता , तर संस्थानची गौरी हत्तीण दिमाखात डोलत चालत होती. गणेशमूर्ती मंदिरात आल्यावर तिची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. आरतीनंतर दोन्ही मुतीर्र् पालखीत ठेवण्यात आल्या. संस्थानचा रथ केळीचे खूंट , फुलांच्या माळा व नारळाच्या तोरणानी सजविला होता. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने रथास तोरण बांधण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड़ उडाली होती.
गणेश मंडळांसह अनेकांनी मंदिराबाहेर प्रसाद वाटपाचे स्टॉल उभारले होते.
|