Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
शस्त्र तस्करीचा म्होरक्या जेरबंद : तीन पिस्तुले हस्तगत

03-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

एलसीबीने आंतरराज्य शस्त्रांची तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करून टोळीच्या म्होरक्यास ३ पिस्तुले आणि ५ जिवंत काडतुसांसह ताब्यात घेऊन त्याच्याकडून १ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या नवीन रावसाहेब गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र व मध्यप्रदेश येथे गुन्हे दाखल आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या तसेच गुंड प्रवृत्तीच्या तसेच अवैध हत्यारे बाळगणार्‍या टोळ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अपर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले यांनी केल्या होत्या. त्या अनुषंगाने एलसीबीचे पथक सांगली शहरात गस्त घालत असताना एकजण सिव्हिल हॉस्पिटल ते एसटी स्टॅन्ड परिसरात हत्यारे विकण्या साठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावला. त्यांना सम्राट व्यायाम मंडळाजवळ एक संशयित आढळला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याजवळ असणार्‍या सॅकमध्ये ३ पिस्तुले व ५ जिवंत काडतूसे सापडली. अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव नवीन रावसाहेब गायकवाड (वय ३७, रा.माधवगंज, उटारखाना, मध्यप्रदेश) असे सांगितले. सांगली जिल्ह्यात हत्यारे विकण्याच्या उद्देशाने आल्याचे सांगितले. त्याच्याबाबत अधिक माहिती घेतली असता विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील बेकायदा शस्त्रे विक्री व बाळगणे या गुन्ह्यात तो पोलिसाना हवा असल्याचे समजले. २०१९ मध्ये अवैध शस्त्रांची विक्री करण्यासाठी आले असताना त्याच्या साथीदारांकडून १ गावठी कट्टा,१ पिस्तूल आणि ५ काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या गायकवाड याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter