23-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपकडून मिरजेचे गणेश माळी व कुपवाडचे गजानन मगदूम यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आता सभापतीपदाचा निर्णय बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपच्या या घडामोडीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी नजर ठेवली आहे. नाराजीचा फायदा उठविण्याच्या तयारीत आघाडीचे नेते आहेत.
महापालिकेच्या स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती व समाजकल्याण समितीच्या सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवार दि. २७ रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
सभापतीपदासाठी गुरूवार दि. २६ रोजी अर्ज दाखल होणार आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या स्थायी समिती सभापतीपदाचा मान सांगलीच्या अजिंक्य पाटील यांना मिळाला होता. त्यामुळे आता मिरज किंवा कुपवाडला संधी मिळणार आहे. या पदासाठी मिरजेतून गणेश माळी व कुपवाडमधून गजानन मगदूम यांची नावे चर्चेत येत आहेत. मिरजेला संधीसाठी कोअर कमिटीतील मिरजेच्या तसेच सांगलीच्या काही नेत्यांनी गणेश माळी यांच्यासाठी आग्रह धरला आहे.
|