Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
बोर्गीजवळ अपघातात एक जागीच ठार, दोन गंभीर

23-Sep-2019 : उमदी / वार्ताहर

राष्ट्रीय महामार्गावर बोर्गी-बालगांव दरम्यान आयशर टेम्पो व दुचाकीचा अपघात होऊन बोर्गी येथील ओंकार उमेश देसाई (वय १७) हा महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे साडेसहा वाजता घडली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की , ओंकार देसाई हा बोर्गी येथील असून करजगी रोडला त्यांचे शेत आहे तेथून तो व त्याचे वर्गमित्र संतोष मल्लिकार्जुन अवजी (रा.बोर्गी , वय १७) व शिवमुर्ती शेखर पाटील (वय १७, रा. आकळवाडी) हे तिघे मिळून दुचाकीवरून (क्र. एम. एच. १३ एस. ०६२०) उमदी येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी रोजच्याप्रमाणे जात असताना वाटेत (क्र. एम. एच. ४२ ए .क्यु.३२९६) या माल वाहतुक करणार्‍या आयशर टेम्पोला समोरून धडकल्याने तिघेही दुचाकी वरून खाली पडले, मात्र यात दुचाकीचालक देसाई याच्या डोक्यास मार लागल्याने जागीच मृत्यू झाला व त्याचे दोन्ही मित्र देखील जखमी झाले, जखमींना विजापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शाळकरी मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती उमदी पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी व सपोनि दत्तात्रय कोळेकर यांनी भेट दिली.

हेल्मेट वापरला असता तर

जीव वाचला असता...

टेम्पो धडकून दुचाकीवरून पडलेल्या देसाई यास डोक्याला जबर मार लागला होते त्यामुळे रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला , मात्र त्याने हेल्मेट वापरला असता तर जीव गमावण्याची वेळ त्याच्यावर आली नसती अशी चर्चा अपघातस्थळी सुरू होती.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter