Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीत गाडगीळांना पक्षांतर्गत आव्हान

23-Sep-2019 : सांगली श्र प्रतिनिधी

सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित असली तरी त्यांना त्यांच्याच पक्षातील माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर व शिवाजी डोंगरेंनी आव्हान दिले आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून जयश्रीताई पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्यात रस्सीखेच आहे. दरम्यान कॉंग्रेसकडून जयश्रीताई पाटील यांची उमेदवारी जवळ जवळ निश्‍चित झाल्याचे वृत्त असून त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी विष्णूअण्णा भवन येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. भाजपमधील नाराज देखील आघाडीच्या नेत्यांना उमेदवारीसाठी भेटले आहेत. त्यामुळे उमेदवार निश्‍चित करण्याचे आव्हान आघाडीपुढे असणार आहे.

या निवडणुकीसाठी भाजपकडून पुन्हा आमदार सुधीर गाडगीळ इच्छूक आहेत , मात्र त्यांना त्यांच्याच पक्षातील माजी आमदार दिनकर पाटील, नीताताई केळकर व शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी आव्हान दिले आहे. दिनकर पाटील व आमदार सुधीर गाडगीळ यांच्यामध्ये आयर्विनच्या पर्यायी पुलावरून वाद झाला होता.

सांगली विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून जयश्रीताई पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी उमेदवारी मागितली आहे. मदनभाऊ गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेऊन उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. मंगळवारी कार्यकर्त्यांचा मेळावा सकाळी अकरा वाजता विष्णूअण्णा भवन येथे होणार आहे. त्याची जय्यत तयारी झाली आहे. याबाबत माहिती देताना विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर म्हणाले, कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी जयश्रीताई पाटील यांनी पक्षाकडे रितसर मागणी केली आहे. पक्षात आम्हाला प्रतिस्पर्धी कोणीही नाही. त्यामुळे उमेदवारी मिळण्यात कोणतीही अडचण नाही.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter