Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
रस्त्यावर व्यायाम करणार्‍या तिघांना ट्रकने चिरडले

23-Sep-2019 : इस्लामपूर / प्रतिनिधी

कराड-तासगाव रोडवर किल्लेमच्छिंद्रगड (ता.वाळवा) येथे व्यायामासाठी गेलेल्या दीपक ज्ञानू गायकवाड (वय ४५), विशाल धोंडीराम गायकवाड (वय २९) व प्रविण हिंदुराव गायकवाड (वय २३, तिघेही रा.शेणोली, ता.कराड) या तिघांना ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ६.४५ च्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. अज्ञात ट्रक चालकाविरोधात इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , शेणोली येथील दीपक गायकवाड, विशाल गायकवाड, प्रविण गायकवाड हे तिघेजण शेणोली येथून कराड-तासगाव रोडने किल्लेमच्छिंद्रगड फाट्याच्या पुलापर्यंत दररोज व्यायामासाठी जात होते. पुलाजवळ असणार्‍या पोल्ट्रीच्या रोडकडेला बसून ते व्यायाम करत असत. सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ च्या सुमारास दीपक गायकवाड, विशाल गायकवाड, प्रविण गायकवाड व रोहित गायकवाड हे चौघेजण व्यायामासाठी शेणोली येथून पायी चालत किल्लेमच्छिंद्रगड गावच्या हद्दीत निघाले होते. मदन मोहिते यांच्या पोल्ट्रीनजीक जावून रस्त्याकडेला असणार्‍या ओढ्यावरील पुलाच्या अलिकडे मोकळ्या जागेत तिघे खाली बसून व्यायाम करत होते, तर रोहित गायकवाड हे उभे होते. सकाळी ६.४५ च्या सुमारास कराडहून तासगावच्या दिशेने जाणारा भरधाव ट्रक रस्त्याच्या उत्तर बाजूला न जाता चुकीच्या बाजुने अचानकपणे आला. ट्रक व्यायाम करणार्‍या युवकांच्या दिशेने येत असल्याचे पाहुन रोहित गायकवाड हे बाजूला झाले , परंतू रस्त्यावर व्यायामासाठी बसलेल्या दीपक गायकवाड, विशाल गायकवाड, प्रविण गायकवाड यांना उठता आले नाही. ट्रक तिघांच्या अंगावरून गेला. अपघातानंतर ट्रक न थांबता तासगावच्या दिशेने निघून गेला. दीपक गायकवाड यांच्या कानातून रक्त आले तर विशाल गायकवाड यांचे डोके फुटून दोघांचा जागीच मृत्यू झाला. प्रविण गायकवाड यांच्या डोक्यातून रक्त येत होते. दोन्ही पाय चेपले होते. या घटनेची माहिती रोहित गायकवाड यांनी कुटूंबियांना दिली. परिसरातील नागरिकांना बोलावून रोहित गायकवाड यांनी प्रविण गायकवाड यांना कराड येथे उपचारास पाठवून दिले. दीपक व विशाल गायकवाड यांना इस्लामपूर येथील उपजिल्हा रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी दोघे मयत असल्याचे सांगितले. प्रविण गायकवाड यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची वर्दी रोहित गायकवाड यांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान लवटे करत आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter