Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
आचारसंहिता भंग केल्यास तात्काळ कारवाई

24-Sep-2019 : सांगली . प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. आचारसंहिता भंग केल्यास तात्काळ कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला. पारदर्शी, भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यात येतील, तसेच दिव्यांग मतदारांच्या सोयीसुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येवू नये, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा , मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, पुणे विभागीय उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त साधना सावरकर, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम , निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी सोयी सुविधा पुरविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे , दिव्यांग मतदारांची मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी पुरेशी वाहने उपलब्ध ठेवावीत. व्हील चेअर्स, रँप आदि आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, पीडब्ल्यूडी वोटर्सचे मार्किंग करा, बीयुसीयु, व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशीनची वाहतूक जीपीएस प्रणाली असलेल्या वाहनातूनच होईल याची काटेकोरपणे दक्षता घ्या, पूरबाधित क्षेत्रांमध्ये ईपीक कार्डांचे वाटप प्राधान्याने करून ईपीक कार्ड नसल्याने कोणीही पूरबाधित नागरिक मतदानापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्या. गत निवडणुकीत कमी मतदान झालेली ठिकाणे निश्‍चित करुन स्वीप उपक्रमावर भर द्या व मतदानाचा टक्का वाढवा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केल्या जाणार्‍या राजकीय स्वरूपाच्या जाहिरातींना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे प्रसिध्दी पूर्व प्रमाणिकरण आवश्यक असल्याचे सांगून सोशल मिडियावरही नजर ठेवा. राजकीय पक्ष व उमेदवारांच्या सामाजिक प्रसार माध्यमांच्या अकाऊंटवर लक्ष ठेवावे, असेही सांगितले.

आचारसंहिता भंग होत असेल तिथे कठोर कारवाई करावी. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter