Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जिल्ह्यात युतीच्या संभ्रमाने चिंता

24-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे, जिल्ह्यात स्वबळावर लढण्याची भाजप आणि शिवसेनेकडून तयारी सुरु आहे. मात्र युती झाल्यास सेनेने जिल्ह्यातील विधानसभेच्या वाट्याच्या चारही जागा ताकदीने लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इस्लामपूर, पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ या तिन्ही विधानसभेच्या जागा भाजपने लढविण्याचा निर्धार करीत रणनिती आखली आहे. सद्यस्थितीत या जागांवर सेनेकडे सक्षम उमेदवार नाहीत , मात्र या जागांवर सेनेने दावा केल्याने भाजपची सध्या कोंडी झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीबाबत युतीच्या संभ्रमावरुन तणाव वाढणार असल्याचे चित्र दिसते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप-सेना युतीचा विधानसभा निवडणुकीसाठी ५०-५० टक्केचा फॉर्म्युला ठरलेला होता , परंतू विधानसभेच्या तोंडावर तो फॉर्म्युला भाजपकडून अमान्य करण्यात आला. सध्या जागा वाटपाबाबतची चर्चा सुरुच आहे. मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही. भाजपकडून १६५ आणि १०५ असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, मात्र सेना अधिक जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे दोन दिवसांत कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सांगली, मिरज, जत आणि शिराळा या भाजपकडे तर खानापूर-आटपाडी शिवसेनेकडे आहे. उर्वरित तीन मतदारसंघांपैकी इस्लामपूर व तासगाव-कवठेमहांकाळ राष्ट्रवादी आणि पलूस-कडेगाव कॉंग्रेसकडे आहे. जिल्ह्यातील चार जागा सेनेच्या वाट्याला येतात. खानापूर-आटपाडीला सेनेचे अनिल बाबर आमदार आहेत. अन्य तीन म्हणजे इस्लामपूर, कडेगाव-पलूस आणि तासगाव-कवठेमहांकाळमध्ये आम्ही ताकदीने लढणार असल्याचे शिवसेना नेते नितिन बानुगडे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

भाजप आणि सेनेची युती असली तरी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद नगण्य आहे. सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना वरिष्ठांनी बळ दिले. पुन्हा विधानसभा निवडणुकीला सेनेला सामोरे जावे लागत आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ सेनेकडे आहे , परंतू या मतदारसंघात भाजपचे युवा नेते व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी विधानसभेची जोरदार तयारी केली आहे. संग्रामसिंह यांना कॉंग्रेसचे आमदार विश्‍वजीत कदम यांच्याविरोधात उभे करुन पलूस-कडेगावची जागा भाजपकडे घेण्याची रणनिती आखून प्रचाराला सुरुवात केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेवेळी देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली. जागा सेनेकडे जागा असली तरी तेथे भाजप जागा आपल्याकडे घेणार असल्याचे स्पष्ट दिसते. पलूस-कडेगावमधून सेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी इच्छुक असल्याचे पक्षाला कळविले आहे.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघही सेनेकडे आहे. येथून पक्षाने निवडणूक लढविली आहे. तेथे पक्षवाढीसाठी प्रयत्न झालेले दिसत नाहीत. भाजपकडून माजी मंत्री अजितराव घोरपडे इच्छूक असून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. विधानसभेसाठी घोरपडे यांना उतरवण्याचा शब्द दिला आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter