27-Sep-2019 : पलूस / प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ गुरूवारी पलूस येथे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अरूणआण्णा लाड यांच्या नेतृत्वाखाली ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले. ‘ईडी’ च्या माध्यमातून खा. शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्याचा ‘रडी’ चा डाव भाजप सरकारकडून खेळला गेल्याची टीका अरूणआण्णा लाड यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष शरद लाड, जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड आदी उपस्थित होते.
अरूणआण्णा लाड पुढे म्हणाले, देशाचे नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीच्या माध्यमातून गुन्हा दाखल करून भाजप सरकारने रडीचा डाव खेळला आहे. हे अव्यवहार्य आहे, हा डाव केवळ राजकीय हेतूने खेळला गेल्याची अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुणआण्णा लाड यांनी भाजप सरकारवर केली.
ते पुढे म्हणाले, देशात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, हे सरकार हुकूमशाही आणू पाहत आहे. वास्तविक खा. शरद पवार यांचा ज्या बँकेशी काहीही संबंध नाही, त्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणात त्यांना गोवले जात आहे, खा. शरद पवार यांच्या भाषणांना होणारी गर्दी आणि त्यांच्याकडे आकृष्ट होणारा युवक वर्ग यामुळेच राज्यकर्त्यांच्या पोटात दुखत आहे, त्यामुळे सुड भावनेने अशी कृत्ये केली जात आहेत.
|