Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
दोन दिवसांच्या पावसाने उपनगरांची दैना : चिखलाने रस्ते गायब

27-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

सांगली शहर व परिसरात दोन दिवस पडलेल्या परतीच्या पावसामुळे उपनगरांची दैना उडाली आहे. शामरावनगर, दत्तनगर, काकानगर, रामकृष्ण परमहंस सोसायटी, शिंदे मळ्यासह अनेक उपनगरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे . गुंठेवारीतील रस्ते चिखलात गायब झाले आहेत. तर खुले भूखंड, पडक्या जागांमध्ये पाणी साचून त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य आता धोक्यात येत चालले आहे.

ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरानंतर सांगली शहरातील अनेक उपनगरात पाणी घुसले होते. या पुराचे पाणी ओसरले असताना पुन्हा परतीच्या पावसामुळे सांगलीकरांचे हाल सुरू झाले आहेत. शामराव नगरातील विश्‍वविनायक चौक, सुंदर कॉलनी, ज्ञानेश्‍वरनगर, घोटीलकर गल्ली, मॉडर्न गल्ली, फिरदौस मोहल्ला, स्वरूपानंद सोसायटी, एकता कॉलनीसह अनेक भागात रस्ते पुरात होते. त्यामुळे तेथील रस्त्यांची चाळण झाली आहे. कच्चे रस्ते वाहून गेले होते. त्यावर थोडा फार मुरुम टाकून ये-जा करण्यापुरते रस्ते केले होते. मात्र मंगळवारी व बुधवारी दोन दिवस पडलेल्या पावसामुळे रस्ते चिखलात गायब झाले आहेत.

शामरावनगरात महापुरानंतरही खुल्या भूखंडांवर पाणी साचून पूर परिस्थिती कायम होती. त्यामुळे पाणी हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने विद्युत पंप लावून पाणी उपसा केला होता. येथील मुख्य रस्ताही डांबरी असला तरी हे सांडपाणी रस्त्यावर चरी मारून गटारीत सोडल्याने दुरवस्था झाली आहे. आता कुठे गुंठेवारीतील खुल्या भूखंडांतून पाणी हटल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला होता , मात्र परतीच्या पावसाचे पुन्हा पाणी साचले आहे. काही ठिकाणी तर हे सांडपाणी घरांमध्ये शिरले. अनेकांच्या दारातच दलदल निर्माण झाली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter