Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
विधानसभेसाठी आजपासून धुमशान

27-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला आजपासून (शुक्रवार) सुरुवात होत असल्याने प्रत्यक्षात रणधुमाळी सुरु होईल. उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) दाखल होण्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा व तालुका निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. संबंधित तहसिलदार कार्यालयात आज (शुक्रवार) पासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान भाजप-शिवसेना युतीचे घोंगडे अद्यापही भिजत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे जागा वाटपही झालेले नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांना ‘वेट ऍण्ड वॉच’ ची भूमिका घ्यावी लागणार असल्याचे दिसते. घटस्थापनेनंतरच उमेदवारी अर्ज भरण्यास धावपळ होण्याची शक्यता आहे.

भारत निवडणूक आयोगाने २१ सप्टेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला . त्याची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झालेली आहे. निवडणुकीची अधिसूचना उद्या (दि. २७) रोजी जाहीर होईल. विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून प्रक्रिया सुरु होत असल्याने प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात २३ लाख ७४ हजार ३७४ मतदार आहेत. सांगली, मिरज, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी आणि जत या विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे नामनिर्देशनपत्रे २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोंबरपर्यंत (सार्वजनिक सुटी व्यतिरीक्त) सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहेत. ५ ऑक्टोंबरला उमेदवारी अर्जाची छाननी, तर ७ ऑक्टोबर रोजी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. २१ ऑक्टोंबरला मतदान तर २४ ऑक्टोंबरला मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शपथपत्रात भाग अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ई-मेल आयडी, संपर्क दूरध्वनी क्रमांक, समाजमाध्यम खाते असल्यास नमूद करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, मान्यताप्राप्त पक्षाचा उमेदवार असल्यास अ व ब फॉर्म नामनिर्देशन पत्रासोबत किंवा नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या अंतिम दिनांकास दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करावे लागणार आहे. नामनिर्देशनपत्रासोबत रोख रकमेची पावती, चलन सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीचा निर्णय अद्याप झालेला नाही.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter