Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
‘स्थायी’सभापतीपदासाठी भाजपकडून संदीप आवटी

27-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपने ऐनवेळी नावात बदल करत मिरजेचे संदीप आवटी यांचा अर्ज दाखल केला. समाजकल्याण सभापतीपदासाठी पुन्हा स्नेहल सावंत यांना मुदतवाढ दिली, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी नसिमा नाईक यांचा अर्ज दाखल करण्यात आला. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून देखील तिन्ही सभापतीपदांसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची सभा होणार आहे .

महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील, समाजकल्याण समितीच्या सभापती स्नेहल सावंत व महिला, बालकल्याण समितीच्या सभापती मोहना ठाणेदार यांची मुदत संपल्याने नूतन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी गुरूवारी दुपारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. स्थायी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये गणेश माळी व गजानन मगदूम यांच्यात चुरस होती , मात्र बुधवारी रात्री अचानक संदीप सुरेश आवटी यांचे नाव पुढे आले. कोअर कमिटीच्या सदस्यांनी देखील संदीप आवटी यांच्या नावावर एकमत केले. त्यामुळे सभापतीपदासाठी संदीप आवटी यांचा गुरूवारी अर्ज दाखल करण्यात आला.

समाजकल्याण समिती सभापतीपदासाठी विद्यमान सभापती स्नेहल सावंत यांनी मुदतवाढ मागितली होती , तर भाजपच्या सोनाली सागरे देखील इच्छूक होत्या , मात्र भाजपच्या नेत्यांनी स्नेहल सावंत यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी भाजपकडून नसिमा नाईक यांना संधी देण्यात आली. या तिघांचे अर्ज दाखल करण्यात आले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter