Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
गोपीचंद पडळकरांची ‘वंचित’ला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाची शक्यता जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला फायदा शक्य

27-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

धनगर समाजाच्या आरक्षणावरुन राज्यभर प्रचाराची राळ उठवून अल्पावधीत प्रसिध्द झालेले नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात त्यांनी वंचित घटकांचे जोरदार संघटन करुन तीन लाखांहून अधिक मते खेचली होती , मात्र आता त्यांनी ‘वंचित’ची साथ सोडल्यामुळे त्याचे मोठे परिणाम विधानसभा निवडणुकीत होणार आहेत. सांगली जिल्ह्यात याचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला होऊ शकतो. आघाडीच्यावतीने ‘वंचित’ ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचा जाहीर आरोप करण्यात आला होता.

गोपीचंद पडळकर यांना लोकसभेत जे मतदान झाले होते त्यापैकी जत, खानापूर-आटपाडी व तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात चांगले मतदान झाले होते. या ठिकाणी दलित, धनगर, काही प्रमाणात मुस्लिम तर ओबीसी घटक एकत्र आल्याचे चित्र होते. याचा परिणाम म्हणून वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षादेखील जास्त मते गोपीचंद पडळकर यांना मिळाली .

विधानसभा निवडणुकीत सुमारे पाच ते दहा हजार मतांचा फरक देखील मोठा परिणाम करु शकतो, अशा परिस्थितीत समाजातील वंचित घटकांचे मतदान सांगली जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात निर्णायक ठरु शकते. गोपीचंद पडळकर यांनी भाजप विरोधात रान तापवून प्रस्थापित नेतृत्वाला धक्का दिला होता , पण आता त्यांनी वंचित आघाडीची साथ सोडल्यामुळे पुन्हा हा घटक कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे वळण्याचा अंदाज राजकीय तज्ञांचा आहे. यापूर्वी वंचित घटकांचे मोठे मतदान कॉंग्रेस-राष्ट्रवादीची व्होट बँक म्हणून गणली जात होती , पण भाजपने व वंचित बहुजन आघाडीने त्याला खिंडार पाडले होते , मात्र आता एमआयएम व वंचित आघाडीची फारकत व त्यानंतर गोपीचंद पडळकर यांचा राजीनामा यामुळे हे मतदान पुन्हा कुणाकडे वळणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter