Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
मातब्बरांचे अर्ज शेवटच्या तीन दिवसात दाखल होणार

28-Sep-2019 : सांगली / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास जरी सुरूवात झाली असली तरी पितृपक्ष पंधरावड्यामुळे महायुतीची घोषणा थांबली आहे, कॉंग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवारांची यादी लांबविली. त्यामुळे अद्याप अर्ज दाखल करण्यास विलंब होत आहे. जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी दि.२, ३ व ४ ऑक्टोबरचा मुहूर्त काढला आहे. त्यामुळे शेवटचे तीन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे

विधानसभेच्या निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी जाहीर झाली असून अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. ४ ऑक्टोबरची आहे. या मुदतीत इच्छुकांना अर्ज दाखल करावा लागणार आहे. सांगली जिल्ह्यात सांगली, मिरज, जत, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव, इस्लामपूर व शिराळा हे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सांगली, मिरज, शिराळा व जत या मतदारसंघात भाजपचे, इस्लामपूर व तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे तर खानापूर-आटपाडी मतदारसंघात शिवसेना व पलूस-कडेगाव मतदारसंघात कॉंग्रेसचे आमदार आहेत. सध्या निवडणुकीचे वातावरण तापले आहे , मात्र दोन दिवसांत एकाही मातब्बर नेत्याने अर्ज भरलेला नाही.

भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा अद्याप झालेली नाही. पितृपक्ष पंधरावडा असल्याने युतीची घोषणा लांबणीवर गेली असल्याचे बोलले जात आहे , तर शनिवारी पितृमोक्ष अमावस्या असल्याने युतीचा कोणताही निर्णय झाला नाही . दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्‍चित झाली, जागा वाटप देखील झाले आहे. मात्र अमावस्यानंतर यादी जाहीर होणार आहे. साधारण रविवारी कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक केवळ पक्षाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत , मात्र अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी मुहूर्त निश्‍चित केला आहे.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील हे इस्लामपूर मतदारसंघातून मंगळवार दि.१ रोजी अर्ज दाखल करणार आहेत. कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आ.विश्‍वजीत कदम हे शुक्रवार दि.४ रोजी अर्ज दाखल करणार आहेत. याच मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे मंगळवारी किंवा बुधवारी अर्ज दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे. मिरजेतील भाजपचे आमदार व विद्यमान मंत्री सुरेश खाडे गुरूवार दि.३ रोजी मिरज विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या विद्यमान आ.सुमनताई पाटील या देखील गुरूवारी अर्ज भरणार आहेत. विटा-खानापूर मतदारसंघातील सेनेचे आ. अनिल बाबर देखील गुरूवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.

जत विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे विक्रम सावंत देखील गुरूवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter