10-Oct-2019 : सांगली / प्रतिनिधी
लिंगायत समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारला भाग पाडू असे आश्वासन आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी लिंगायत समाजाच्या बैठकीत बोलताना दिले.
शिवाजीनगरमधील लिंगायत बोर्डिंगमध्ये आयोजित बैठकीत आ.गाडगीळ बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक करताना बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने म्हणाले, ‘ लिंगायत धर्मास मान्यता व अल्पसंख्याक म्हणून दर्जा मिळाला पाहिजे यासाठी आम्ही २ वर्षांपूर्वी आमची ताकद दाखवून दिली आहे.मान्यता हा विषय केंद्राच्या अखत्यारीत असला तरी राज्य सरकार याबाबत प्रस्ताव पाठवू शकते. जतचे डॉ.रविंद्र आरळी यांचा सर्वेत रिपोर्ट चांगला असतानाही त्यांना डावलले. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी काहीतरी केले पाहिजे.आ.गाडगीळ यांचे मताधिक्य गतवेळीपेक्षा दुपटीने वाढेल. ते अजातशत्रू असल्याने असल्या नेत्याला आम्ही गमावू शकत नाही असे सांगितले. रावसाहेब घेवारे म्हणाले, आपल्या कामाने दादांनी सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान मिळविले आहे. गेल्या १५ वर्षांत मिळाला नव्हता इतका निधी आ.गाडगीळ यांनी गेल्या ५ वर्षांत आणला आहे. असा आमदार पुन्हा होणे शक्य नाही. त्यांच्या सुवर्णपेढीप्रमाणेच त्यांचे काम १०० टक्के शुद्ध असल्याचे सांगितले. अशोक पाटील यांनी टक्केवारीशिवाय काम करणारा निष्कलंक व स्वच्छ चारित्र्याचा आमदार म्हणजे सुधीरदादा गाडगीळ असे सांगितले. आ.गाडगीळ आपल्या मनोगतात पुढे म्हणाले,‘ लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी पुढच्यावेळी अधिक निधी देऊ. मार्केट यार्डातील व्यापारी व माथाडींचे प्रश्न तसेच आहेत, वारंवार आंदोलन होतय म्हटल्यावर त्या ठिकाणी येणार्या ग्राहकावर परिणाम होतो. व्यापार्यांना चांगले दिवस आले पाहिजे.
|