Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सांगलीतील लॉजमध्ये तरुणीचा गळा आवळून खून

10-Oct-2019 : सांगली / प्रतिनिधी

येथील बसस्थानकासमोरील ‘टुरिस्ट लॉज’मध्ये एका १९ वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास खुनाची घटना घडली असावी असा अंदाज आहे.वृषाली अर्जुन सूर्यवंशी (वय १९, रा.पंचशीलनगर, सध्या रा.कोल्हापूर रोड, सांगली) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

वृषाली बुधवारी रात्री साडेआठ वा. मैत्रिणीकडे जेवायला जाते असे सांगून बाहेर पडली होती. रात्री उशिरापर्यंत वृषाली घरी परत न आल्याने तिचे कुटुंबीय चिंतेत होते. घरच्यांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मोबाईल लागला नाही. गुरुवारी पोलिसाना बसस्थानकासमोरील टुरिस्ट लॉज मधील एका खोलीत तरुणीचा घातपात झाला असावा अशी माहिती समजली. त्यानुसार पोलीस लॉजमध्ये पोहोचले. लॉजच्या व्यवस्थापकाला घेऊन ते खोलीजवळ गेले. खोलीला बाहेरून कडी होती. कडी उघडून आत प्रवेश केला असता वृषालीचा मृतदेह पलंगावर उताणा पडला होता. या प्रकरणी अविनाश लक्ष्मण हातेकर याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. तो गायब झाला असून पोलिसानी त्याचा शोध सुरु केला आहे. त्यांनी लॉजमध्ये आल्यावर दिलेल्या ओळखपत्रावरील फोटो आणि नाव अस्पष्ट आहे. याची माहिती मिळताच सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर आणि संजयनगरचे सपोनि काकासाहेब पाटील आणि पोलिसाचा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी पोलिसाना तपासाबाबत योग्य सूचना दिल्या. घटनास्थळी वृषालीचे कुटुंबीय उपस्थित होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter