Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
पराभवाच्या भितीनेच विरोधकांकडून टीका : आ.बाबर

10-Oct-2019 : विटा / प्रतिनिधी

विरोधकाच्या प्रचारासाठी सभा घेणारे प्रत्येकजण टेंभू योजना या एकाच मुद्द्यावर वेगवेगळी मते मांडून जनतेची दिशाभूल करत आहेत. एक म्हणतो टेंभू हा निवडणूकीचा मुद्दाच होवू शकत नाही. तर दुसरा म्हणतो विरोधकांच्यामुळेच टेंभू योजना पुर्ण झाली . तर तिसरा म्हणतो कोट्यवधीचा निधी दहा वर्षात दिला. टेंभूसाठी मी रात्रीचा दिवस केला आहे. आणि जे केले आहे ते जनता जाणतेच आहे आणि तेच मी सांगतो. पण ज्यानी ही योजना दिवास्वप्न मानले ते आज उघडपणे आम्ही केल्याचे सांगत आहेत. प्रचाराचे मुद्दे आणि त्यात एकवाक्यता नसणे हे त्यांच्या विचलितपणाचे लक्षण आहे. विरोधकांना पराजयाची चाहूल लागल्यामुळेच बोलण्यात विचलितपणा आला आहे, अशी टीका आ. अनिलराव बाबर यांनी केली.

हिंगणगादे (ता.खानापूर) येथे आयोजित प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.

आमदार अनिलराव बाबर पुढे म्हणाले , विरोधक आणि आणि त्यांच्या हस्तकांनी टीका करताना किमान एकमताने तरी करावी. गेल्या पाच वर्षांत मी केलेली विकासकामे, आणि टेंभूची पुर्ती यामुळे माझा विजय नक्की आहे हे माहित असल्यामुळेच विरोधक आणि त्यांचे हस्तक एकाच मुद्दयावर वेगवेगळी मते मांडत आहेत. मी गेली पस्तीस वर्षे राजकारण करत आहे.मी समाजकारण आणि सामान्य माणूस यांना डोळ्यांसमोर ठेवून जनतेची सेवा केली आहे. मी केलेली कामे सगळ्या मतदारसंघाला माहित आहेत. मला विरोधकांवर टीका करण्याची गरज नाही, पण विरोधकांनी स्वतःच्या विकासाला प्राधान्य देवून जनतेच्या डोळ्यांत धुळ फेकली आणि आता आम्हीच सगळे केल्याचे सांगत फिरत आहेत, पण त्यांनी जनतेला फसविणे बंद करावे. अन्यथा जनता ही जनार्दन असते. ती तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter