10-Oct-2019 : जत / प्रतिनिधी
कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने १५ वर्षात महाराष्ट्राला रसातळाला नेले मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने सहकार, उद्योग, अर्थ, कृषि, सिंचन, दुग्धव्यवसाय यासारख्या अनेक बाबींमध्ये महाराष्ट्राला वरच्या क्रमांकावर पुन्हा स्थान प्राप्त करुन दिले. सांगली जिल्ह्यातील ११ लाख शेतकर्यांची ३७०० कोटी रुपयांची कर्जमाफी शासनाने केली. म्हैसाळ, टेंभू योजनेसाठी भरीव निधी दिल्यामुळे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा कायापालट झाला. जतला आता तुबची बबलेश्वर योजनेच्या माध्यमातून कर्नाटक शासनाकडून पाणी देण्यात येेईल, यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा व देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे, पाणी निश्चित मिळेल, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांनी जत येथे बोलताना दिली. भाजपचे उमेदवार आ.विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत ते बोलत होते. या सभेच्या निमित्ताने भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. निवडणुकीतील अमित शहा यांची ही पहिलीच सभा होती.
अमित शहा पुढे म्हणाले, कॉंग्रेसवाल्यांनी सहकार संस्था मोडीत काढल्या, सिंचन योजनांत भ्रष्टाचार केला, शेतकर्यांना देशोधडीला लावले, मात्र गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने महाराष्ट्र पुन्हा विकासाच्या वाटेवर आणून ठेवला असून राज्याला प्रगतीपथावर आणण्यासाठी पुन्हा भाजप-सेना युतीला सत्तेवर आणा. असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जत येथे प्रचार सभेत बोलताना केले.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० व ट्रिपल तलाक ही विधेयके धाडसाने मंजूर केली, मात्र याच निर्णयाला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध करत देशाच्या अखंडतेच्या जम्मू- काश्मीरच्या ३७० कलम रद्द करण्याचा विधेयकाला विरोध केला. आज हे कलम रद्द करून दोन महिने झाले तरी सुद्धा काश्मीर खोर्यात शांतता आहे.केंद्रात व राज्यात १५ वर्षे सत्ता असणार्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व शरद पवार यांनी काय केले ते सांगावे असे आव्हानही गृहमंत्री शहा यांनी दिले.
यावेळी आमदार विलासराव जगताप म्हणाले , गेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह प्रचारासाठी आले होते, त्यावेळी १७ हजार मतांनी आघाडी मिळून विजय झाला होता ,आता तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आलेले असल्याने निश्चितच आणखी मोठे मताधिक्य मिळून माझा विजय होणार आहे.मला मिळालेली उमेदवारी ही पक्षातून व जनतेच्या पाठींब्याने मिळाली आहे. ३५ वर्षात जत तालुक्यात म्हैसाळ योजनेवर ३६५ कोटी रुपये खर्च झाले,तर माझ्या पाच वर्षांच्या काळात ३९२ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. सेना-भाजप युती सरकारमुळे जत तालुक्यात रस्त्यांची कोट्यवधी रुपयांची कामे होऊन गेल्या ७० वर्षांतील बॅकलॉग भरून निघाला असून विजेचा प्रश्न, जलयुक्त शिवार योजना, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आदी कोट्यवधी रुपयांची विकासकामे झालेली असून आता आमची एकच मागणी आहे,ती म्हणजे उर्वरित जत पूर्व भागाला पाणी मिळावे.
|