05-Nov-2019 : भाजपला घरचा आहेर
सांगली / प्रतिनिधी
सांगली व मिरज ड्रेनेज योजनेच्या ठेकेदारांकडून दंडाची वसुली न करता दीड कोटींचे बिल अदा केले आहे. यामुळे मंगळवारी उपमहापौर धिरज सुर्यवंशी यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाच्या विरोधात महापालिकेच्या दारातच ठिय्या आंदोलन करून सत्ताधारी भाजपलाच घरचा आहेर दिला, अखेर महापौर व गटनेत्यांनी मध्यस्थी करत दि. ११ नोव्हेंबरला ड्रेनेज ठेकेदार व अधिकार्यांची बैठक घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर उपमहापौरांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले.
सांगली, मिरजेतील ड्रेनेज योजनेची कामे गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहेत. वास्तविक योजनेच्या निविदा प्रक्रियेपासूनच वाढीव दराने मंजुरीमुळे वादाची झालर लागली आहे. त्यानंतर दोनवेळा मुदतवाढ देऊनही कामे पूर्ण झाली नाहीत. यामुळे एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या ठेकेदार कंपनीला २०१६ पासून सांगलीच्या कामांसाठी प्रतिमहिना २५ हजार तर मिरजेच्या कामांसाठी १५ हजार रुपये दंड केला आहे , परंतु आज अखेर ४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला नाही. एवढेच नव्हे तर ठेकेदाराला दंड माफीचा आणि पुन्हा मुदतवाढीचा विषय ऑगस्टमध्ये स्थायी समितीसमोर आला होता. स्थायी समितीने मुदतवाढीला मंजुरी दिली , पण दंडमाफीचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात ढकलला होता.
महासभेत उत्तम साखळकर यांनी उपस्थित केलेल्या विषयावर महापौर संगीता खोत यांनी बिले थांबविण्याचा ठराव केला होता. असे असताना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात प्रशासनाने ठेकेदाराला सांगली, मिरजेच्या कामांपोटी १ कोटी ५९ कोटी रुपये रनिंग बिलापोटी दिले.
|