05-Nov-2019 : शामरावनगरमधील संतप्त नागरिकांचे जलआंदोलन, उपायुक्तांना चिखलात फिरविले
सांगली / प्रतिनिधी
शामरावनगरमध्ये पाणी साचले असताना मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. याच्या निषेधार्थ शामरावनगरमधील संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराविरोधात भूखंडात साचलेल्या पाण्यात बसून जलआंदोलन केले. उपायुक्तांना चिखलातून फिरवून या भागातील परिस्थिती जाणवून दिली , तर प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
शामरावनगर आणि परिसरातील विठ्ठलनगर, कालिकानगर, रुक्मिणीनगर अशा उपनगरांमध्ये ऑगस्ट महिन्यात पुराचे पाणी आले होते. त्यानंतर गेले दोन महिने सातत्याने जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे या परिसरात असणार्या मोकळ्या भूखंडामध्ये पाणी साचून राहिले आहे. त्याचबरोबर येथील अनेक मोकळ्या भूखंडांमध्ये मोठ्या प्रमाणात झुडपेही वाढली आहेत. त्यामुळे तेथे साचलेल्या पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांची उत्पत्ती वाढून मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी या परिसरात साथीचे आजार बळावले आहेत. त्याचा नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. नागरिकांनी या परिसरातील साचलेले पाणी काढावे यासाठी महापालिकेकडे वारंवार मागणी केली होती , मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले .
या परिसरातील पाणी मोटारने काढण्याचा प्रयत्न केला , पण तो असफल झाला. त्यामुळे साचलेले पाणी बरेच दिवस तसेच राहिले. पाणी काढण्याच्या मागणीकडे महापालिका प्रशासनाने इशारा देऊनही दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी या परिसरातील नागरिकांनी थेट मोकळ्या भूखंडामध्ये साचलेल्या पाण्यात बसून जलआंदोलन केले.
|