11-Jan-2020 : बेडग / वार्ताहर
मिरज तालुक्यातील बेडग येथे नवीन बस थांबा उभारणीच्या जागेवर पौर्णिमेच्या मध्यरात्री लिंबू, सुया, बिब्बा उतारा टाकण्यात आल्याचा प्रकार शनिवारी सकाळी समोर आला. या प्रकारामुळे अंधश्रध्दाळूंमध्ये घबराट पसरली असली तरी तरूणाईने या प्रकाराची समाजमाध्यमातून नवीन बस स्टॉपसाठी गारवा आल्याचा संदेश व्हायरल करीत या प्रकाराची खिल्ली उडविली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजेपासून काही अंतरावर असलेल्या १५ हजार लोकवस्तीच्या बेडग गावाच्या पूर्वेला मंगसुळी कॉर्नर येथे नवीन बस थांबा उभारण्याचे काम सुरू आहे. रात्री बारा वाजेपर्यंत या चौकामध्ये मुले गप्पा मारत असतात , मात्र त्यानंतर या ठिकाणी शांतता असते. गुरूवारी पौष पौर्णिमा होती. अज्ञाताने या ठिकाणी उतारा टाकला. यामध्ये दुरडीमध्ये चिरलेली पपई, त्यामध्ये काळे तीळ, दाभण, लिंबू , हिरवे कापड, हळद, कुंकु, बुक्का, नारळ अशा वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.
हा प्रकार शनिवारी उघडकीस आला व अंधश्रध्दाळुंमध्ये घबराट पसरली.
|