Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सुंदर सांगली हे माझे स्वप्न : आयुक्त कापडणीस

11-Jan-2020 : सांगली प प्रतिनिधी

हॅबीटॅट प्रदर्शनाच्या निमित्ताने सांगलीकरांसमोर विविध संकल्पनांचे दालन खुले झाले आहे. त्याला प्रतिवर्षाप्रमाणे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. चांगले घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्याचप्रमाणे सांगली सुंदर असावी असा माझे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी आग्रही आहे. सांगलीशी माझे नाते घट्ट आहे. मी शहराला माझे घर समजतो, त्यामुळे शहराच्या विकासासाठी कटीबध्द आहे. घरांचे बांधकाम व सजावटीसाठी हॅबीटॅट प्रदर्शनाचा सांगलीकरांना निश्‍चितच फायदा होईल, असा विश्‍वास आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्यक्त केला.

इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशनच्यावतीने हॅबीटॅट २०२० प्रदर्शनाचे उद्घाटन आयुक्त कापडणीस आणि अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले यांच्या हस्ते करण्यात आले. विश्रामबाग येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर दि.१४ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे येथील नाविन्यपूर्ण स्टॉलसह अन्य जिल्ह्यांतील देखील स्टॉलचा लाभ सांगलीकरांना घेता येणार आहे. यावेळी बोलताना आयुक्त कापडणीस म्हणाले, सांगलीतील इंजिनिअर्स आणि आर्किटेक्टस्च्या कल्पक संकल्पनेतून शहर परिसरात अनेक चांगल्या बंगल्यांची उभारणी झालेली आहे. शहरातून फेरफटका मारताना आपल्याला याचा प्रत्यय येतो.

भविष्यात प्रदर्शनाचा कालावधी वाढवावा अशी सूचनाही त्यांनी केली. अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले म्हणाल्या, जी व्यक्ती नवीन घराची उभारणी करणार आहे किंवा ज्याला घरात अत्याधुनिक सजावट करायची आहे , त्यांच्यासाठी हॅबीटॅट प्रदर्शन अत्यंत उपयुक्त आहे. आपले घर चांगले असावे असे प्रत्येकाला वाटते व त्यानुसार तो कार्यरत असतो. या प्रदर्शनामध्ये घर सजावटीला लागणार्‍या साहित्यांचे उत्कृष्ट स्टॉल्स असून त्याचा लाभ सांगलीकांना होईल.

स्वागत असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले. प्रास्ताविक समन्वयक प्रशांत पाटील-मजलेकर यांनी केले. यावेळी ट्रस्टी अध्यक्ष व्ही. एल. मेहता, ट्रस्टी सचिव प्रमोद चौगुले, सचिव केदार टाकवेकर, प्रमोद परीख, कृष्णा ट्रेडर्सचे अमित व सचिन डोळ, फेनेस्टाचे संकेत सारडा, अल्ट्रा टेकचे नरेंद्र केंकळेकर आदी उपस्थित होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter