11-Jan-2020 : मिरज / प्रतिनिधी
येथील गाढवे पेट्रोल पंपाजवळ बोलवाड रोडवर डॉ.दगडू बापू काळे (वय ३५, रा.रामगुरवाडी ता. खानापूर, जि.बेळगाव) यांना शुक्रवारी दिवसाढवळ्या अज्ञात तिघांनी रिक्षातून नेवून चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा एकूण २४ हजार ९५० रूपयांचा मुद्देमाल काढून घेवून पलायन केले. तिघा अज्ञातांच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात डॉ. काळे यांनी फिर्याद दिली असून चबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की , डॉ. दगडू काळे हे रात्री मिरज रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी दुपारी ४ वाजता उतरले. ते मिशन हॉस्पिटलला जाण्यासाठी म्हणून रिक्षात बसले. एका रिक्षा चालकाने तुम्हाला मी सोडतो असे सांगितले. डॉ. काळे हे रिक्षात बसायला गेले त्यावेळी त्या रिक्षात आणखी एक अनोळखी इसम बसला होता. रिक्षा निघाल्यानंतर रिक्षा मिशन हॉस्पिटलच्या दिशेने न जाता ती वेगळ्या दिशेने जाताना डॉ. काळे यांनी रिक्षाचालकास हा मिशन हॉस्पिटलकडे जाण्याचा मार्ग नाही. तुम्ही कुठे रिक्षा घेवून निघाला आहात असे विचारले. रिक्षाचालकाने डॉ. काळे यांना हे दुसरे गृहस्थ बसले आहेत, त्यांना सोडून शॉर्टकटने मिशन हॉस्पिटलला जावूया असे सांगितले. रिक्षा गाढवे पेट्रोल पंपाकडून बोलवाड रस्त्याकडे निघाल्यानंतर रिक्षात बसलेल्या अनोळखी इसमाने डॉ. काळे यांच्या गळ्याला धरून मारहाण करू लागला. डॉ. काळे यांनी आरडाओरडा सुरू केला. त्याचवेळी आणखी एक अनोळखी इसम रिक्षाजवळ आला. त्यावेळी रिक्षा चालकाने चाकु काढून डॉ.काळे यांना मारण्याचा प्रयत्न केला. डॉ. काळे यांनी चाकुचा वार चुकविल्याने त्यांच्या मनगटाला चाकू लागला. तिघा अनोळखी इसमांनी डॉ. काळे यांच्याजवळ असलेल्या सॅगमधील रोख २० हजार ३५० रूपये, दोन मोबाईल, एटीएम कार्ड, रेशन कार्ड घेवून डॉ. काळे त्यांना मारहाण करून त्यांना तेथेच सोडून रिक्षातून गायब झाले. डॉ. काळे यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात तिघांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
|