Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
ना.जयंत पाटील यांच्यासमोर जिल्ह्याच्या एकत्रित विकासाचे आव्हान

11-Jan-2020 : सांगली प प्रतिनिधी

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात १५ वर्षात ना.जयंत पाटील यांनी मुख्यत्वेकरुन वाळवे तालुक्यात लक्ष केंद्रीत केले. पालकमंत्री म्हणून पतंगराव कदम व जिल्ह्याच्या पूर्व भागात आर.आर. पाटील यांच्यामुळे त्यांनी फारसे लक्ष घातले नाही , मात्र आता पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यामुळे त्यांना संपूर्ण जिल्ह्याचा एकत्रीत विकास डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करावी लागेल. आघाडी सरकारच्या काळात सांगली महापालिकेला ते निधी देऊ शकले नव्हते तर सांगली-इस्लामपूर व सांगली-कोल्हापूर हे रस्तेदेखील पूर्ण झाले नव्हते. १५ वर्षांत विकासामध्ये राहिलेल्या चुका गतीने मार्गी लावण्याची संधी त्यांना मिळाली असल्यामुळे युध्द पातळीवर सिंचन योजनांसह रस्ते, उद्योग व शेती विकास त्यांच्याकडून अपेक्षित आहे.

आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात मुख्यत्वेकरुन स्मारकांवर निधी खर्च झाला. रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती. देवेंद्र फडणवीस सरकारने मात्र रस्ते कामांना गती दिली. सांगली महापालिकेला तब्बल १०० कोटींचा निधी दिला. महापालिका क्षेत्रातही रस्त्यांसाठी मोठा निधी दिला गेला. मनोहर जोशी सरकारच्या काळात ज्या पध्दतीने ताकारी-म्हैसाळ-टेंभूची कामे गतीने झाली होती तशी गती आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात जिल्ह्यात दिग्गज मंत्री असतानादेखील घेता आली नव्हती. लाल दिवे खूप झाले , पण प्रत्यक्षात कामाचा उरक मात्र कमी होता.

आता याची भरपाई करण्याची जबाबदारी ना.जयंत पाटील यांच्यावर आहे. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून दुसर्‍या तालुक्यात जाण्यासाठी धड रस्ता नाही, महापालिकेतील अनेक कामे अपूर्ण आहेत, औद्योगिक वसाहती बंद पडत आहेत, ताकारी-म्हैसाळ-आरफळ-वाकुर्डेची कामे अत्यंत धिम्या गतीने सुरु आहेत, जतच्या पाणीप्रश्‍नावर बैठका होतात पण प्रश्‍न सुटत नाही . महापालिका व नगरपालिका क्षेत्रात अतिक्रमणांची बजबजपुरी झाल्यामुळे कोणत्याही रस्त्याने जाता येत नाही. अवकाळी पाऊस, महापूर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. काही साखर कारखाने बंद आहेत, या सर्वांचा विचार ना. जयंत पाटील यांना करावा लागेल. सत्कार समारंभात जादा वेळ दवडता थेट कामांना सुरुवात करायला हवी.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter