16-Feb-2020 : सांगली / प्रतिनिधी
तुम्ही केलेली सगळी कामे लोक विसरतील पण त्यांना केलेली वैद्यकीय मदत ते कधीही विसरत नाहीत, हेच काम निवडणुकीत उपयोगी येते. या जोरावरच मी निवडून येत असल्याचे सांगत आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे मत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने आयोजीत महाआरोग्य शिबिरास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर घेण्याचा उपक्रम चांगला आहे. समाजातील गरीब माणसांना अजूनही आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. धर्मादाय दवाखान्यात गरिबांना मोफत उपचार दिले पाहिजेत हा कायदा आहे गरिबांसाठी धर्मादाय दवाखान्यात दहा टक्के खाटा राखीव ठेवल्याचे पाहिजेत, या अटीवरच धर्मादाय दवाखान्यांना शासनाने मोफत, कमी दराने जागा दिल्या आहेत. त्यांना बांधकामासाठी वाढीव एफएसआय दिला आहे , तसेच विविध करामध्ये ही सवलत दिली आहे , मात्र असे असूनही अनेक धर्मादाय दवाखाने गरीब रुग्णांवर मोफत उपचार करत नव्हते त्यामुळं मी या खात्याच्या मंत्री असताना विधानसभेत याबाबत कायदा केला. धर्मादाय दवाखान्यांनी दहा टक्के गरिबांवर मोफत उपचार न केल्यास त्या ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी व प्रमूख डॉक्टरना सहा महिन्यांचा कारावास ,२५ हजार रुपये दंडाची तरतूद कायद्यात केली. यानंतर मात्र धर्मादाय दवाखान्यात गरिबांवर मोफत उपचार सुरू झाले.
|