Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
राज्यातील २१ लाख शेतकर्‍यांना १४ हजार कोटींचा मिळणार लाभ

29-Feb-2020 : सांगली / प्रतिनिधी

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा राज्य सरकारने जाहीर केला असून यामध्ये २८ जिल्ह्यांमधील २१ लाख २८ हजार शेतकर्‍यांना १४ हजार कोटींची कर्जमाफी मिळणार आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील ७६ हजार २७ शेतकर्‍यांना दुसर्‍या यादीत कर्जमाफी योजनेचा लाभ झाला आहे. पहिल्या यादीत ५९६ शेतकर्‍यांना लाभ मिळाला होता.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेेची दुसरी यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील तब्बल ७६ हजार २७ शेतकर्‍यांना कर्जमुक्ती मिळाली आहे. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि विकास सोसायट्यंामध्ये रविवारपासून कर्जमुक्तीच्या याद्या लावल्या जाणार असल्याचे सहकार विभागाच्यावतीने सांगण्यात आले. पहिल्या यादीत जिल्ह्यातील अवघ्या ५९६ शेतकर्‍यांना लाभ मिळाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली होती. जिल्ह्याची दुसरी यादी जम्बो असल्याने शेतकर्‍यांना अखेर कर्जमुक्तीचा दिलासा मिळाला.

महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना कर्जमुक्तीची योजना जाहीर केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी कर्जमाफीची यादी जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले होते. राज्यातील १५ हजार ३५८ पात्र शेतकर्‍यांची पहिली यादी २४ फेबु्रवारीस जाहीर झाली होती. मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महात्मा फुले कर्जमुक्तीची दुसरी यादी शनिवारी प्रसिद्ध केली. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट केले होते. या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहु नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील ९० हजार १०७ थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास ५२८ कोटी रूपयांची कर्जमाफी होवून हे शेतकरी कर्जमुक्त होतील, असा अंदाज आहे. दुसर्‍या यादीत ७६ हजार २७ शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहीर झाली आहे. त्यांची रक्कम अद्याप समजलेली नाही. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी सांगितले. सरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफी अटींशिवाय असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यासाठी शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज देणे, तसेच हेलपाटे घालावे लागणार नसून ही कर्जमाफी सुटसुटीत असल्याचा सरकारने दावा केला आहे. प्रारंभी दोन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल घेतलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली आणि परतफेड न झालेली रक्कम २ लाखांपर्यंत आहे, अशा शेतकर्‍यांना अल्प आणि अत्यल्प भूधारक या प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात २ लाखांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासन आणि बँकांकडून सुरु करण्यात येत आहे. एखाद्या शेतकर्‍याचे एक-दोन बँकामध्ये कर्ज आहे, मात्र ती रक्कम २ लाखांच्या आतील आहे, त्यांनाही कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter