Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
राज्यात दुधामध्ये भेसळ : अन्नमंत्र्यांची कबुली

29-Feb-2020 : सांगली / प्रतिनिधी

राज्यात दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याची कबुली अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. भेसळ करणार्‍यांविरुध्द कठोर कारवाई केली नाही , तर संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई करु, असा इशारा त्यांनी दिला. सांगलीतील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने त्यांचा मंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या शासक समितीचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते व आ. प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत ना. राजेंद्र पाटील - यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला .

सत्काराला उत्तर देताना ना. यड्रावकर म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना शैक्षणिक संस्थांनी सामोरे जावे. लठ्ठे एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देत आहे. विविध शाखांच्या माध्यमातून अनेक यशस्वी विद्यार्थी घडविण्याचे समाजोपयोगी कार्य संस्था करीत असून त्यातून एक वेगळा आदर्श निर्माण होत आहे. परंतु ज्या पध्दतीने आजची शिक्षण पध्दती बदललेली आहे , त्या बदललेल्या शिक्षण पध्दतीला सामोरे जावून येणार्‍या सर्व आव्हानांचा स्विकार सर्वच शिक्षण संस्थांनी करावा, असेही त्यांनी सांगितले.

तसेच २५ वर्षांपेक्षा अधिक काळ शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जनतेशी असलेली नाळ तशीच कायम ठेवल्यामुळे मला राजकारणात यश मिळाल्याची कबुलीही त्यांनी दिली. आ. प्रकाश आवाडे यांचा संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. पी.आर. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आवाडे यांनी आपल्या भाषणात संस्थेचा इतिहास तसेच शैक्षणिक संस्थांनी व्यवस्थापन कौशल्यावर आधारित संकल्पना राबवाव्यात असे सांगितले. माजी आमदार प्रा.शरद पाटील म्हणाले, दिवाणबहादुर आण्णासाहेब लठ्ठे यांच्या विचारांचा वारसा घेवून संस्था बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव सुहास पाटील यांनी केले. स्वागत संस्थेचे चेअरमन शांतीनाथ कांते यांनी केले. यावेळी प्रमोद चौगुले, लॉ कॉलेजचे प्राचार्य पी.एस. जोशी यांच्यासह विविध शाखांचे प्रमुख, प्राध्यापक, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter