29-Feb-2020 : सांगली / प्रतिनिधी
मुंबई बाजार समिती निवडणुकी साठी पुणे विभागातील दोन जागांसाठी सांगली येथील केंद्रावर मतदारांनी चुरशीने मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ९९ आहे. मतमोजणी सोमवार दि. २ मार्च रोजी मुंबई बाजार समिती आवारात होणार आहे.
बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक सुरु होती. राज्यातील सहा विभागातून प्रत्येकी दोन संचालक निवडून जाणार आहेत. एकूण ६०१ मतदार आहेत. महाविकास आघाडीकडून पुणे जिल्ह्यातील धनंजय वाडकर, तर सातार्यातून बाळासाहेब सोळस्कर हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चंद्रसेन रामचंद्र काटकर (मु. वडजळ, ता. माण, जि. सातारा), प्रदिपकुमार गंगाराम खोपडे (मु. पो. आंबाडे, ता. भोर, जि. पुणे), महादेव कुंडलीक यादव (मु. पो. बोरीहेंदी, ता. दौंड, जि. पुणे) हे अपक्ष निवडणूक मैदानात होते. पुणे विभागातून एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. भाजपने थेट एकही उमेदवार निवडणूक मैदानात उतरविला नाही .
सांगली जिल्ह्यात बाजार समितीचे १०४ मतदार आहेत. त्यापैकी आटपाडीचे चव्हाण यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक आण्णासाहेब कोरे यांच्या आईचे शनिवारीच निधन झाले. उर्वरित १०२ मतदारांनी विजयनगर येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथे मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. या केंद्रावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या मतदार आणि कार्य कर्त्यांची गर्दी होती. भाजपने थेट उमेदवार उभा न केल्यामुळे त्यांचे फारसे कुणी मतदान केंद्राकडे फिरकलेच नाही. मतमोजणी सोमवार दि. २ मार्च रोजी मुंबई बाजार समिती आवारात होणार आहे.
|