19-Mar-2020 : सांगली / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील ३३ हजार घरांचा सर्व्हे पूर्ण झाला असून उर्वरित सर्व्हे दोन दिवसात पूर्ण होणार आहे. झालेल्या सर्व्हेत सुमारे १४१ नागरिक परदेशातून आल्याचे आढळून आले आहे . ते होम क्वॉरंटाईन असून नोटीसा बजाविल्या असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली , तर कोरोनाचा एकही रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून मास्क व सॅनिटायझरचा वापर न करता केवळ हात साबनाने धुवावेत, असे आवाहन आयुक्तांनी केले.
ते पुढे म्हणाले, कोरोनाचा धोका वाढण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या होत्या. त्या अंतर्गत रॅपिड रिस्पॉन्सिबल टीम तयार केली आहे. याचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर हे नोडल ऑफिसर आहेत. एकूण वीस प्रभागनिहाय वीस टीम आणि त्यांचे आरोग्य अधिकारी प्रमुख आहेत. सुदैवाने महापालिका क्षेत्रात एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. विविध २४ देशांतून आलेल्या ५६ जणांची शासनाकडून यादी आली होती , पण आपण घर टू घर सर्व्हे सुरू ठेवल्यामुळे परदेशात प्रवास करून आलेले १४१ जण निष्पन्न झाले. त्यांना १४ दिवसांसाठी घरीच देखरेखीखाली ठेवले आहे. त्यांची दिवसातून तीनवेळा भेट घेवून आशा वर्कर तर वैद्यकीय अधिकारी एकवेळा भेटून चौकशी करीत आहेत. मी स्वत:ही काही ठिकाणी भेटी देऊन चौकशी केली. सर्वजण सहकार्य करीत आहेत , पण त्यातील काहीजण इतरत्र परस्पर सहली, फिरण्याचे उद्योग करीत आहेत.
|