19-Mar-2020 : सांगली / प्रतिनिधी
दोघे परप्रांतीय घरफोडी करून पलायन करीत असताना स्थानिक नागरिकांनी थरारक पाठलाग करून त्यांना पकडले. किरण मनोहर भवर (वय २५) आणि मेहरसिंग रामसिंग गुंदड (वय २४, दोघे रा. खनिंबा ता. कुक्षी जिल्हा धार) अशी या संशयित आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संशयित दोघे परप्रांतीय आरोपी मध्यप्रदेशमधून सांगली जिल्ह्यामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. या दोघांनी आज गुरूवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास धामणी रोडवर असणार्या इरसेड भवन जवळील सिद्ध वलभ कृपा अपार्टमेंट, फ्लॅट नं.१०२ मधील एका बंद फ्लॅटचे ग्रीलचे दरवाजे आणि मुख्य प्रवेश दरवाजाचे लॉक कटरने तोडून घरात शिरले . घरातील कपाटातील सोन्याचा लक्ष्मीहार, टिक्का, चार बिल्वर, पाच अंगठ्या, एक गंठण, तीन सोन्याच्या अंगठ्या, चार जोड कर्णफुले, एक चांदीचे मोठे ताट, एक लहान ताट, फुलपात्र , लहान वाट्या, आरतीचे ताट, मोठ्या वाट्या, मोठे करंडक, दोन लहान करंडक, पळी, पंचपात्र, दोन आरत्या, दोन घंट्या, अत्तर दाणी, छन्ना, धुपआरती, लहान चमचा, उदबत्ती स्टँङ, चांदीचे चार कॉईन आणि रोख रक्कम १ लाख ६० हजार असा एकूण ५ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल चोरला . हे दोघे सुरक्षा भिंतीवरून उडी मारून जात असताना , आजूबाजूच्या नागरिकांनी या दोघा चोरट्यांना पाहिले, नागरिकांनी त्या दोघा चोरट्यांचा पाठलाग केला. या दोघा संशयित आरोपींनी पळून जाण्यासाठी अंकली येथील नदीमध्ये उडी मारली. त्यांनी पोहून नदी पार केली मात्र त्या दोघा चोरट्यांचा तिथेही पाठलाग करून नागरिकानी त्या दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
या दोघा संशयित आरोपींच्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. परप्रांतीय घरफोडी करणार्या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता सहा. पोलीस निरीक्षक अमित पाटील यांनी वर्तविली असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.
|