Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
इस्लामपुरात कापड दुकानास आग : 30 लाखांचे नुकसान

23-Sep-2017 : इस्लामपूर / प्रतिनिधी

इस्लामपूर-वाघवाडी रोडवर असणाऱ्या शास्त्रीनगर येथील दर्शन फॅशन कलेक्शन या कापड दुकानाला शॉर्ट सर्किटने भीषण आग लागून सुमारे 25 ते 30 लाखांचे नुकसान झाले. कापड दुकानातील फर्निचर व कपडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिसांत झाली आहे.

शास्त्रीनगर रस्ता क्रमांक 4 येथे अनिरुद्ध आनंदा वळीव यांच्या मालकीचे दर्शन फॅशन कलेक्शन हे दुकान आहे.

या दुकानाच्या वरील मजल्यावर वळीव कुटुंबिय वास्तव्यास आहेत. दसऱ्याच्या पार्श्वभूमिवर या दुकानाच्या पाठीमागील बाजूला असणाऱ्या जागेत नवीन दुकान सुरू करण्यासाठी फर्निचरचे काम सुरू होते. तसेच कापड मालही मोठया प्रमाणात आयात करण्यात आला होता. शनिवार दि. 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास वळीव कुटुंबिय कोल्हापूरला खरेदीसाठी निघाले. काही वेळातच त्यांच्या कापड दुकानामध्ये शॉर्ट सर्किट होवून आग लागली. दुकानातून धूर बाहेर आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी दुकानाकडे धाव घेतली. त्यावेळी दुकानाच्या शटरला कुलूप होते. नागरिकांनी कुलूप तोडून शटर उचकटले. तर दुकानात आग लागून फर्निचर व कपडे जळत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती नागरिकांनी अनिरूध्द वळीव व इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाला दिली. कोल्हापूरला निघालेले वळीव कुटुंबिय रस्त्यातून पाठीमागे आले. काही वेळातच अग्निशामक विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व आग विझवण्याचे काम सुरू झाले. काही वेळाने आग आटोक्यात आली. परंतु तोपर्यंत दुकानातील साहित्य व कापड असे मिळून अंदाजे 25 ते 30 लाखाचे नुकसान झाले होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter