Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
सरकारविरुद्ध राष्ट्रवादी आक्रमक, कॉंग्रेस थंडच

23-Sep-2017 : सांगली / प्रतिनिधी

ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई, जीएसटीच्या अंमलबजावणीतील घोळ, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट, पत्रकार गौरीलंकेश हत्याप्रकरण, वाढती असहिष्णुता, अंगणवाडी शिक्षकांचा प्रश्न असे प्रश्न आ-वासून उभे असताना एका बाजुला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते दौरे व त्यानंतर आंदोलन करत असताना कॉंग्रेस मात्र विरोधी पक्ष म्हणून गलितगात्र झालेली दिसत आहे. जिल्हा कॉंग्रेसच्या तर आपण विरोधी पक्षात आहोत, हे गावीच नाही अशी परिस्थिती आहे. जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांच्यावर जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कॉंग्रेसने संतप्त होऊन कडेगावात मोठा मोर्चा काढला. पण हाच संताप जनतेच्या प्रश्नांवर कॉंग्रेस नेत्यांमध्ये का दिसत नाही, असा प्रश्न उभा रहात आहे.

देशातील व राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी कॉंगे्रसने आक्रमक भूमिका घेतली असताना कॉंग्रेसच्या राज्य व जिल्ह्यांतील नेत्यांमध्ये अद्याप शांतताच असल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी जिल्हा दौरा करत मेळावे घेतले. महागाई, वीज दरवाढविरोधात आंदोलने केली. मात्र कॉंग्रेसचे राज्य व जिल्हा पातळीवरील नेते मात्र कोमात आहेत.

देशात व राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना जिल्ह्यात दोन्ही पक्षाची मोठी ताकद होती. नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्या देखील कॉंगे्रस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असायच्या. मात्र गेल्या तीन वर्षांपूर्वी दोन्ही पक्षाला अधोगती लागली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपच्या तंबूत शिरल्याने भाजपची चांगली प्रगती झाली आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व अनेक पंचायत समित्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातून गेल्या आहेत. राज्यात भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे राज्यस्तरावरील राष्ट्रवादी नेत्यांचे पाय जमिनीवर आले आहेत. त्यांनी विविध माध्यमातून राज्यभर दौरे सुरू केले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दोन महिन्यांपूर्वी सांगलीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी विविध सेलचा आढावा घेतला. राष्ट्रवादी सत्तेतून पायउतार झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने पक्ष वाढवावा व भाजपच्या कारभाराचे अपयश जनतेतून मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राष्ट्रवादी पक्ष कामाला लागला आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले. महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील आक्रमक झाली आहे. तर वीज दरवाढ विरोधात जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे सरकार विरोधात राष्ट्रवादी आक्रमकपणे लढा देत असल्याचे चित्र आहे.

कॉंग्रेसचे नेते मात्र शांतच आहेत. जिल्ह्यात कॉंग्रेसचे नेतृत्व डॉ. पतंगराव कदम करतात. मात्र ते भाजपच्या कारभारावर आक्रमक अशी भूमिका कधी मांडत नाहीत. त्यांचे पुत्र विश्वजीत कदम युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. बंधू मोहनराव कदम आमदार असून जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे त्यांनी भाजप सरकार विरोधात आंदोलन केले नाही. माजी खासदार प्रतीक पाटील यांनी देखील सांगली लोकसभा मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र त्यांनी सध्या कॉंग्रेस व सांगली लोकसभा मतदारसंघाला दूर केल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुका आल्या की नेते जागे होतात. मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे या नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे.

भाजप सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची फसवणूक केली असल्याचे आता सर्वसामान्यांतून बोलले जात आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाली आहे. या सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे कॉंग्रेसने लक्ष देणे आवश्यक होते. मात्र कॉंग्रेसचे नेते कोमात गेले आहेत. त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. देश व राज्यातील सत्ता गेली तरी त्यांचे पाय अद्याप जमिनीवर आले नाहीत. यामुळे सक्षम विरोधक म्हणून आता जिल्ह्यातील जनता कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जास्त पाहत आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter