Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
अभियंत्यांच्या प्रश्नांसाठी ‘गांधीगिरी’ नव्हे ‘भगतसिंगगिरी’च हवी : आ.बच्चू कडू
News Image

25-Sep-2017 : सांगली / प्रतिनिधी

राज्यातील अभियंत्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून ‘काम बंद’ आंदोल सुरु आहे. परंतु सद्यस्थितीत अभियंत्यांचे प्रश्न गांधीगिरीने सुटणार नसून यासाठी भगतसिंगगिरीच अवलंबली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले. ते सांगली जिल्हा स्थापत्य (सु.बे.) अभियंता संघटनेच्यावतीने आयोजित अभियंतादिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजू शेट्टी उपस्थित होते.

शेतकरी,सामान्य जनता यंाना रोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अभियंत्यांना अनेक प्रश्न आहेत हे मला आजच समजले. मग या देशात कोण सुखी आहे? मेक इन इंडिया म्हणायचे आणि त्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अभियंत्यानाच झोपवायचे हे सरकारचे धोरण आहे. तुमच्या न्याय मागण्यांसाठी तीव्र आंदोलन केल्यास त्या लढ्यात आम्हीही उतरु, असे आ.कडू यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले की, सरकारी ठेकेदारीत हुजरेगिरी करणाराच टिकतो. सध्याच्या सरकारचा कारभार पाहता ‘आधीचेच बरे होते’ असे म्हणायची वेळ आली आहे. अभियंत्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला लावू या.

कार्यक्रमाच्या सुरवातीला वस्तु व सेवा कर विभागाचे उपायुक्त योगेश कुलकर्णी यांचे जीएसटी कराबाबत मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमास राज्य स्थापत्य अभियंता (सु.बे.) संघटनेचे अध्यक्ष दिलीप मेदगे, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलींद भोसले, कार्यकारी अभियंता देवेंद्र जाधव, पृथ्वीराज चव्हाण, संजय माळी,माजी अधीक्षक अभियंता आर. बी. शिंदे, इंद्रजित साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter