Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
चंदूर ओढ्यावरुन मोटारसायकलस्वार वाहून गेला : सकाळी मृतदेह मिळाला

25-Sep-2017 : इचलकरंजी /प्रतिनिधी

रविवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे चंदूर ओढ्याच्या पुलावरुन बांधकाम व्यावसायिक प्रकाश मारुती वासुदेव (वय 44, रा.शाहूनगर, गल्ली नं.11 चंदूर) हा मोटारसायकलस्वार वाहून गेला. त्याचा मृतदेह सोमवारी (दि.25) सकाळी 11 वाजता मिळाला. या ओढ्यावरील नवीन पुलाचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी रास्तारोको केला. मृतदेहासह प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

मयत प्रकाश मारुती वासुदेव हे बांधकाम व्यावसायिक होते. नवरात्र असल्यामुळे मंगसुळी (ता.अथणी) येथील खंडोबाला तेल घालण्यासाठी ते गेले होते. रात्री घरी परतत असताना पावसामुळे चंदूर ओढ्यावरील पुलावर पाणी आले होते. या पाण्यात त्यांनी आपली पॅशन प्रो मोटारसायकल घातली. पण पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते मोटारसायकलसह वाहून गेले. सकाळी अग्निशमन दलाने त्यांचा मृतदेह पुलापासून दीड कि.मी. अंतरावर शोधून काढला. याबाबत सुनिल मारुती वासुदेव यांनी शिवाजीनगर पोलिसात वर्दी दिली. सध्या असलेला पूल खूप कमी उंचीचा आहे. थोडा जरी पाऊस पडला तरी या पुलावरुन पाणी येते व वाहतुक बंद होते. म्हणून नवीन पुलाचे बांधकाम चालू आहे पण ते सध्या बंद आहे. हे बांधकाम त्वरीत पूर्ण करावे म्हणून चंदूर, शाहूनगर येथील नागरिकांनी मृतदेहासह रास्तारोको करत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter