Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील कर्जखात्यांची पडताळणी सुरु

25-Sep-2017 : सांगली / प्रतिनिधी

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातून 3 लाख 47 हजार अर्जाची नोंदणी झाली आहे. तर 1 लाख 88 कुटुंबांनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केले आहेत. सहकार विभागाकडून सोसायटीकडील कर्जखात्यांची लेखापरीक्षकांमार्फत पडताळणी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील 763 पैकी 118 सोसायटीतील कर्जदारांची पडताळणी पूर्ण झाली असल्याचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत, त्या अर्जदारांची माहिती 2 ऑक्टोंबरपासून चावडी वाचन करून जनतेसमोर आणली जाईल.

शेतकऱ्यांसाठी 28 जून 2017 ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. कर्जमाफी योजनेसाठी सातत्याने अनेकवेळा निकष बदलण्यात आले, त्यामुळे बँकासह शेतकऱ्यांत गोंधळ निर्माण झाला होता. सेतू केंद्रातून आपलं सरकार या पोर्टलवर संपूर्ण राज्यातून कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले होते. शेतकऱ्यांना अर्ज भरताना सर्व्हर डाऊन, अंगठा मॅच न होणे, बोटांच्या ठशाचा प्रश्न आणि केंद्रावर असलेल्या गर्दीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधेच्या अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे 15 सप्टेंबरनंतर कर्जमाफी अर्जासाठी सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. जिल्ह्यात कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदानासाठी जिल्ह्यातील सुमारे दोन लाख 57 हजार शेतकरी पात्र आहेत. जिल्ह्यात 3 लाख 47 हजार वैयक्तिक शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले असल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये 1 लाख 88 हजार कुटुंबांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले आहेत.

सहकार विभागाकडून सोसायटीतील कर्जखात्यांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात 763 सोसायट्या आहेत. लेखापरीक्षकांमार्फत 118 सोसायट्यामधील कर्जखात्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter