Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
इस्लामपूर-शिवनगर येथील तिघांना डेंग्यूची लागण

25-Sep-2017 : इस्लामपूर / प्रतिनिधी

इस्लामपूर-शिवनगर येथील गफूर बाबू मणेर (वय 45), अनिस गफूर मणेर (वय 16), नफिस गफूर मणेर (वय 15) या तिघांना डेंग्यूची लागण झाली आहे. तिघांवर सांगली सिव्हिल येथे उपचार सुरू आहेत. शिवनगर परिसरात डेंग्यूची लागण झालेले रूग्ण आढळल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत माहिती अशी, इस्लामपूर येथील शिवनगर या उपनगरामध्ये गफूर बाबू मणेर व त्यांची दोन मुले अनिस व नफिस यांना ताप आला होता. त्यांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांच्या शरीरातील रक्तपेशी कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्या तिघांना पुढील उपचारासाठी रविवार दि. 24 सप्टेंबर रोजी सांगली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी डेंग्यूची तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. याची माहिती राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांना मिळताच त्यांनी सांगली सिव्हील येथे रूग्णांना भेट देवून चौकशी केली व याची माहिती मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांना दिली. मुख्याधिकारी झिंजाड यांनी शिवनगर येथील मणेर यांच्या घरी भेट देवून परिसराची पाहणी केली. मणेर यांच्या घरापाठीमागे गोबरगॅसचा मोठा खडडा आहे. या खडडयामध्ये पाणी साचल्याने डासांची पैदास झाली असावी अशी शक्यता वर्तवून हा खडडा मुरमाद्वारे मुजवण्यात आला. तसेच परिसरातील भागात औषधे फवारण्यात आली. उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक आर. आर.भोई यांनी मणेर यांच्या परिसरातील नागरिकांच्या वैद्यकिय तपासण्या केल्या. नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी करत स्वच्छतेच्या सुचना दिल्या. दरम्यान सांगली सिव्हील येथे मणेर कुटुंबियांवर उपचार सुरू असताना आ.जयंत पाटील यांनी फोनवरून डॉ.भागवत यांच्याकडून रूग्णांची विचारपूस करत दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या. इस्लामपूर शहरालगत असणाऱ्या उपनगरांची संख्या वाढत आहे परंतु त्याप्रमाणात उपनगरातील नागरिकांना सोई सुविधांची कमतरता भासते. शिवनगर परिसरामध्ये अनेक ठिकाणी पाऊसाच्या पाण्याचे साठे निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर अनेक ठिकाणी नाल्यांचे दुर्गंधीयुक्त पाणी पाऊसाच्या पाण्यात मिसळल्यामुळे डेंग्यू सारखे रोग पसरण्याची भिती निर्माण केली जात होती. सध्या शिवनगरातील मणेर कुटुंबियांना डेंग्यूची लागण झाल्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून सफाई मोहिम सुरू केली आहे. शिवनगराप्रमाणे शहरातील सर्व उपनगरातील स्वच्छता मोहिम होणे गरजेचे आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter